|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 48 तासात भामटे जेरबंद

48 तासात भामटे जेरबंद 

प्रतिनिधी/ निपाणी

30 लाखात 6 किलो सोने देतो असे आमिष दाखवून बनावट सोने देत रक्कम लांबवलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात निपाणी पोलिसांना यश आले आहे. केवळ 48 तासात फसवणूक प्रकरणाचा छडा लावण्यात आला असून फसवणूक प्रकरणातील जिह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी मंजुनाथ धर्मराज बजंत्री (वय 27) व हणमंत दुर्गाप्पा सोपीन (वय 22 दोघेही रा. माचनहळ्ळी-कोरचरहट्टी ता. हरपनहळ्ळी, जि. दावणगेरी) या दोघांना कलम 420 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, उस्मानाबाद जिह्यातील आप्पाराव वडदरे (रा. भुळज, ता. उमरगा) यांना मंजुनाथ व हणमंत यांनी संपर्क साधून आमच्या जमिनीत जुन्या काळातील सोने सापडले आहे. एकूण 6 किलो सोने असून ते केवळ 30 लाखात देतो, असे सांगितले. कमी पैशात मोठे घबाड मिळणार असल्याने वडदरे हे सोने घेण्यास तयार झाले. त्यानुसार वडदरे यांना 8 ऑक्टोबर रोजी कोगनोळी टोलनाकानजीक येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार वडदरे हे 6 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास कोगनोळी टोलनाक्यावर आले.

यावेळी मंजुनाथ व हणमंत हे टाटा निक्सॉन क्र. (केए 17 झेड 5277) कारने कोगनोळी टोलनाक्यावर आले. यावेळी त्यांनी आप्पाराव वडदरे यांना 6 किलो वजनाचे छोटे-छोटे सोन्याचे तुकडे दिले. यानंतर 30 लाख रुपयांची रक्कम घेऊन परत निघाले. यावेळी सोने घेऊन उस्मानाबादच्या दिशेने जाणारे वडदरे यांनी कोल्हापूरनजीक गेले असताना वाटेत त्यांनी सोन्याची पुन्हा एकदा तपासणी केली.

यावेळी त्यांना सोने बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर पुन्हा वडदरे यांनी कोगनोळी टोलनाक्यावर येऊन पाहणी केली असता मंजुनाथ व हणमंत हे पसार झाल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर वडदरे यांनी याची फिर्याद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. यानंतर पोलिसांनी कोगनोळी टोलनाका व हत्तरगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तत्काळ तपास सुरू केला. त्यानंतर खबऱयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बागेवाडी ते बेळगाव दरम्यानच्या रस्त्यावर धाड टाकून कारसह मंजुनाथ व हणमंतला ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील 27 लाख 70 हजार रुपयांची रोकड व सुमारे 10 लाख रुपये किंमतीची कार असा 37 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आणखीन बनावट सोनेही जप्त केले. यानंतर आरोपी मंजुनाथ व हणमंत यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

सदर कारवाई जिल्हा पोलीसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी, चिकोडी विभागाचे एएसपी मिथुनकुमार, सीपीआय संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज तळवार, शहरचे उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला, एएसआय एस. आय. कम्मार, ए. बी. गिड्डारे, हवालदार नारायण पुजेरी, प्रकाश सावोजी, उमेश माळगी, संजू काडगौडर, राजू कोळी, मुत्ताण्णा तेरदाळ, सांगर कांबळे, मंजू खोत, शेखर असोदे व व मुरुगेश जंबगी यांनी केली. अवघ्या 48 तासात निपाणी पोलिसांनी सदर प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

सदर व्यापाऱयाचीही चौकशी सुरु

दरम्यान, 6 किलो सोन्याच्या आशेने 30 लाख रुपये दिलेल्या आप्पाराव वडदरे यांचीही चौकशी होणार आहे. यासंदर्भात आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी व बुधवारी निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाला भेट दिली. यावेळी वडदरे यांच्याकडे एवढी मोठी रक्कम आली कोठून? याची चौकशी करण्यात येत आहे. या रकमेचा तपशील न दिल्यास वडदरे यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

‘त्या’ गावातील अनेकांवर गुन्हे

 बनावट सोने विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेले मंजुनाथ व हणमंत हे दावणगेरी जिह्यातील माचनहळ्ळी-कोरचरहट्टी या गावचे आहेत. विशेष म्हणजे या गावातील अनेकांवर बनावट सोने विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे समजते. यापूर्वीच्या सोनेविक्री प्रकरणातही या गावचे नाव आले आहे.