|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कोनेवाडी येथे डेंग्यूचा बळी

कोनेवाडी येथे डेंग्यूचा बळी 

वार्ताहर/ उचगाव

कोनेवाडी येथील एका शेतकऱयाचा डेंग्यूने बळी गेल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. यल्लाप्पा गोपाळ कंग्राळकर (वय 55, रा. कोनेवाडी) असे मयत शेतकऱयाचे नाव आहे. यल्लाप्पा यांचे आरोग्य बिघडल्याने त्यांना बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथेही त्यांची तब्येत अधिक खालावल्याने त्यांना इतरत्र हलविण्यात आले. पण शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व सुना असा परिवार आहे.

तुरमुरी कचरा डेपोचा परिणाम

शासनाने तुरमुरी येथे कचरा डेपो लादला आहे. तो हलविण्यासाठी अनेक वेळा आंदोलने, रास्तारोको व निवेदने देण्यात आली. मात्र, प्रशासनाने नागरिकांचा आवाजच दाबून टाकला आहे. आवाज उठविणाऱया अनेक संघटनाही हळूहळू निष्क्रीय बनल्या. तुरमुरी कचरा डेपोचा सर्वाधिक फटका तुरमुरी, उचगाव, कोनेवाडी व बाची गावांना बसत आहे. आरोग्य खात्याकडून नागरिकांना आवश्यक सुविधाही पुरविल्या जात नाहीत. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने या भागातील अनेक नागरिक सध्या वेगवेगळय़ा आजारांनी ग्रस्त आहेत.

18 विद्यार्थ्यांचे बिघडले आरोग्य

तुरमुरी गावामध्ये सध्या 18 विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यांना ताप, खोकला, सर्दी व अंगदुखी अशा आजारांनी घेरल्याचे समजते. वर्गामध्ये गैरहजर राहत असल्याने शिक्षकांनी चौकशी करताच आजाराचे कारण पुढे केले जाते. यावरून आरोग्य खाते किती सतर्क आहे, हे दिसून येते. आरोग्य खात्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तुरमुरी कचरा डेपो परिसरातील चार गावांमध्ये शासनाने तातडेने जंतूनाशक फवारणे करावी, पाण्याची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.