|Friday, October 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » मी शिवाजी पार्कमध्ये दिग्गजांची मांदियाळी

मी शिवाजी पार्कमध्ये दिग्गजांची मांदियाळी 

मोठमोठय़ा कलाकारांना एकत्र घेऊन चांगल्या दर्जाचा चित्रपट बनवणे हे दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असतं. काही दिग्दर्शकांना मात्र हे कसब चांगलंच अवगत असतं. हिंदीपासून मराठीपर्यंत नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळय़ा विषयावरील चित्रपट बनवणाऱया निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांनी कायम बडय़ा कलाकारांसोबत चित्रपट केले आहेत. ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी मराठी चित्रपटही याला अपवाद नाही. या चित्रपटात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर हे दिग्गज एकत्र दिसणार आहेत. गौरी पिक्चर्स प्रोडक्शन आणि महेश मांजरेकर मूव्हीजचा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

न्यायदेवता आंधळी असते… आम्ही डोळस होतो अशी टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’मध्ये पाच दिग्गजांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आपली एक खासियत आहे. विक्रम गोखले यांनी मराठी रंगभूमीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात नायकाच्या भूमिकेत दिसलेल्या गोखलेंनी साकारलेल्या चरित्र भूमिकाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहणाऱया ठरल्या आहेत. सतीश आळेकर हे नाव एकांकिकांपासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत आणि छोटय़ा पडद्यापासून मोठय़ा पडद्यापर्यंत विविध पातळीवर गाजलेलं आहे. अशोक सराफ हे केवळ नावच खूप आहे. विनोदी अभियनाचा बादशहा असं बिरुद मिरवणाऱया अशोक सराफ यांनी हिंदी सिनेसफष्टीतही आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. आपल्या अनोख्या अभिनय शैलीमुळे छोटय़ा पडद्यापासून मोठय़ा पडद्यापर्यंत आबालवफद्धांना मोहिनी घालण्याचं कसब शिवाजी साटम यांच्याकडे आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य दिलीप प्रभावळकरांच्या ठायी आहे.

 अशा सर्व दिग्गजांना एकाच फ्रेममध्ये आणण्याचं काम दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी मी शिवाजी पार्क या संवेदनशील कलाकृतीच्या माध्यमातून केलं आहे. या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस आदी बरेच कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचं शीर्षक आणि टॅगलाईन पाहता ‘मी शिवाजी पार्क’मध्ये काहीतरी गहन विषय मांडण्यात आल्याची चाहूल नक्कीच लागते. या चित्रपटाची निर्मिती दिलीप यादव आणि सिद्धार्थ जैन यांची आहे.