|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मराठमोळय़ा स्नेहलची आंतरराष्ट्रीय भरारी

मराठमोळय़ा स्नेहलची आंतरराष्ट्रीय भरारी 

पिकुळे ते शिकागो : स्नेहल गवसचा देदीप्यमान प्रवास : दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून : ध्येय, परिश्रमाने गाठले यश

  • कुडाळच्या जि. प. पडतेवाडी शाळेत प्राथमिक शिक्षण
  • कुडाळ हायस्कूलमध्ये झाले माध्यमिक शिक्षण
  • शास्त्राrय नृत्य, साहित्य, वक्तृत्वामध्येही नैपुण्य
  • अमेरिकेत बडय़ा कंपनीत उच्च पदावर नोकरी

 

तेजस देसाई / दोडामार्ग:

सिंधुदुर्ग जिल्हय़ाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा विचार करता मराठी माध्यमाच्या शाळा पटसंख्येअभावी बंद पडत चालल्या आहेत. इंग्रजी बोलता आले, तरच नोकऱयाही मिळतात. परदेशात नोकरीसाठी जायचे असेल, तर इंग्रजीतूनच शिक्षण हवे. मराठीत शिकून इंग्रजी बोलता येत नाही, असा मतप्रवाह समाजात असताना दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे गावची सुकन्या स्नेहल मोहन गवस हिने मात्र असेच काही नाही, हे दाखवून दिले आहे.

जि. प. च्या शाळेत प्राथमिक, तर पुढे माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातूनच घेऊन  स्नेहल आता अमेरिकेत एका बडय़ा कंपनीत डेटा सायन्टिस्ट म्हणून उच्च पदावर कार्यरत आहे. आपल्यासमोर मोठे ध्येय असेल आणि ते साध्य करण्याची क्षमता असेल तर माध्यम नव्हे गुणवत्ता कामी येते, याचेच हे उदाहरण. प्रत्येक टप्प्यावर शिक्षक व आई-वडिलांचे मार्गदर्शन यामुळे तिने दोडामार्ग तालुक्यासह जिल्हय़ाचे नाव उज्ज्वल केले आहे. वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी, तर आई जि. प. मध्ये महत्त्वाच्या विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्यांनी आपल्या मुलीला सहज कुठच्याही बडय़ा स्कूलमध्ये प्रवेश घेतला असता. मात्र त्यांनी गुणवत्ता ओळखून मराठीचा पर्याय स्वीकारला, हे महत्त्वाचे.

डोळे दीपवणारे यश

अमेरिकेसारख्या प्रगत देशात जाऊन माहिती व तंत्रज्ञानाचे उच्चशिक्षण घ्यावे, असे जगातील अनेक मुलांचे स्वप्न असते. असेच एक स्वप्न घेऊन उच्च शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्नेहल गवससारखी एक मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुलगी अमेरिकेत उच्च शिक्षणात प्राविण्य मिळविते, तेव्हा ती नक्कीच कौतुकाचा विषय ठरते. स्नेहलच्या प्रयत्नांना यशाचे पंख लाभले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तिने मिळविलेले हे यश डोळे दीपवून टाकणारे ठरले.

प्रवास पिकुळे ते शिकागो

स्नेहल मूळ दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे या छोटय़ाशा खेडेगावातील. तिचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या कुडाळ पडतेवाडी या शाळेत, तर माध्यमिक शिक्षक कुडाळ हायस्कूलमध्ये झाले. तिने माहिती तंत्रज्ञान या विषयात आत्मसात केलेल्या प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या एका बडय़ा कंपनीत तिची अलीकडेच डेटा सायन्टिस्ट (वैज्ञानिक) म्हणून नियुक्ती झाली आहे. तिने लहात वयातच मिळविलेल्या या उत्तुंग अशा यशामुळे मराठी मुलांच्या गुणवत्तेबद्दल शंका घेणाऱयांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घातले गेले.

अष्टपैलू गुणवत्ता

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे स्नेहलने अगदी लहानपणापासूनच शास्त्राrय नृत्य, साहित्य, कथाकथन, वक्तृत्व अशा अनेक विषयात प्राविण्य मिळविले. या स्पर्धांमधून तिने शालेय जीवनात अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय सन्मान प्राप्त केले. कुडाळ हायस्कूल व त्यानंतर मुंबईला रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना तिने आपल्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच अनेक स्पर्धांमधून पुरस्कार प्राप्त केले. 2004 साली घेण्यात आलेल्या विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत ती सिंधुदुर्ग जिल्हय़ात प्रथम आल्याने तिची निवड कोल्हापूर विभाग स्तरावर करण्यात आली. कोल्हापूर विभागातील सहाही जिल्हय़ात तिने प्रथम क्रमांक पटकावल्याने तिची राज्य पातळीवर निवड करण्यात आली. तिने या काळामध्ये सातत्य ठेवून राज्य पातळीवरील पुरस्कार स्वत:च्या प्रयत्नांनी प्राप्त केले.

गुणवत्तेच्या कक्षा विस्तारल्या

स्नेहलने 2007 साली मुंबई येथील रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि खऱया अर्थाने तिच्यातील गुणवत्तेच्या कक्षा विस्तारत गेल्या. रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना तिने मुंबई येथील अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविले. या कालावधीत तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. महाराष्ट्र शासनाच्या युवा व क्रीडा संचालनालयातर्फे 2008 साली घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तिने मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकावला व तिची निवड राज्यस्तरासाठी झाली. 2008 साली राज्यस्तरीय वक्तृत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिने राज्यात प्रथम येण्याचा दुसऱयांदा विक्रम नोंदवला. त्यामुळे तिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात केले.

आंतरराष्ट्रीय झेप

बालवयातच तिने असंख्य पारितोषिके, सन्मान प्राप्त झाले. आकाशवाणी, दूरदर्शन वाहिन्यांवरूनही तिचे अनेक कार्यक्रम झाले. पंडित बिरजू महाराज, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे तिला मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. मुंबई विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञानमधील इंजिनिअरिंगची पदवी प्रथम श्रेणीत ती उत्तीर्ण झाली. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेली स्नेहल आपल्या गुरुवर्यांचा खूप आदर करते. इंजिनिअरिंगची पदवी गुणवत्तेत उत्तीर्ण झाल्याने तिला अनेक कंपन्यांकडून ऑफर आल्या. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका आंतरराष्ट्रीय आय. टी. कंपनीत रुजू झाली. त्या कंपनीत उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा असूनही तिचे मन तिला त्या कंपनीत रुळू देत नव्हते. आणखी पुढे जायचे आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धेत उतरायचे आहे, यासाठी उच्च शिक्षणाचा ध्यास तिने घेतला. एक दिवस तिने नोकरीचा राजीनामा दिला. पूर्ण विचारांती व शांत मनाने.. जागतिक स्तरावरील स्पर्धा जिंकायची आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच.

प्रगतीची दारे खुली

स्नेहलचा हा निर्णय धाडसी निर्णय होता. ती चेन्नईहून मुंबईला परतली. माहिती तंत्रज्ञातातील पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने अमेरिकेत जाण्याचा ध्यास घेतला. त्या दिशेने तिने प्रवासही सुरू केला. रात्रं-दिवस अभ्यास करून तिने अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक परीक्षांचा अभ्यास केला. तिच्या परिश्रमास अपेक्षित यश मिळाले आणि अखेर एक दिवस ती मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमेरिकेसाठी रवाना झाली. अत्यंत धाडसी निर्णय, ध्येय गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, मुलगी असूनही निर्भिडता व आत्मविस्वास या जोरावर तिने दोन वर्षांचा आय. आय. टी. अभ्यासक्रम शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण केला. जगातील प्रगत समजले जाणारे तंत्रज्ञान ज्यामध्ये डेटा सायन्स, प्रेडिक्शन, आर्टिफिशीअल, इंटेलिजन्स, बिग डेटा यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन नैपुण्य प्राप्त केले. तिने डेटा सायन्समध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली. त्यामुळे तिच्या उज्ज्वल भविष्यात प्रगतीची दारे खुली झाली.

अमेरिकेतील मोठय़ा कंपनीत संधी

तिला अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांकडून ऑफर आल्या. काही महिन्यांपूर्वीच ती एका बडय़ा अमेरिकन कंपनीत शिकागो या ठिकाणी डेटा सायिन्टीस्ट या पदावर रुजू झाली. तिच्या करिअरची सुरुवातच अप्रतिम झाली आहे. यावरून तिच्या भविष्याच्या प्रगतीचा चढता आलेख कसा असेल, याबाबत कल्पनाच केलेली बरी. तिच्या प्रयत्नांच्या पंखांना मिळालेले हे यश आणि करिअरच्या सुरुवातीला घेतलेली गरुडझेप ही मराठी माध्यमांच्या मुलांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. माहिती व तंत्रज्ञानाच्या या जगात उच्च प्रतीच्या शिक्षणास असलेले महत्त्व तिच्या यशाने अधोरेखित केले आहे. आजच्या मुलांनी फक्त उच्चशिक्षण घेऊन पदव्या मिळविणे एवढी बाब पुरेशी नसून त्यामध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता आणि स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी बदलणारे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रामाणिक परिश्रम, आत्मविश्वास याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, ही बाब स्नेहलच्या यशातून आपल्यासमोर आली आहे.