|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीत बिल्डरकडून गोळीबार

कणकवलीत बिल्डरकडून गोळीबार 

गृहनिर्माण सोसायटी अध्यक्षाला धमकावण्यासाठी कृत्य : सुभाष भोसलेवर अदखलपात्र गुन्हा : चार वर्षे सुरू आहे वाद

वार्ताहर / कणकवली:

जानवली-आदर्शनगर येथील गृहनिर्माण सोसायटी व सदर इमारत बांधणारा बिल्डर यांच्यातील वादातून पिस्तूलमधून फायरिंग होण्याची घटना रविवारी सकाळी कणकवलीनजीक घडली. बिल्डर सुभाष श्रीधर भोसले (रा. जानवली – आदर्शनगर) याने ‘मॉर्निंग वॉक’वेळी साईसृष्टी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष किशोर अनंत दाभोलकर (रा. जानवली-वाकाडवाडी) यांना ठार मारण्याची धमकी देत पिस्तूलमधून दोन राऊंड फायर केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास जानवली-सखलवाडी रस्त्यावर साकेडी फाटा येथे घडली. दरम्यान, दाभोलकर यांच्या तक्रारीनुसार सुभाष भोसले याच्याविरोधात भादंवि कलम 506 नुसार जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानवलीत सकाळीच झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने तेथील काहींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर दाभोलकर यांनी सोसायटीच्या अन्य पदाधिकाऱयांना घटनास्थळावरूनच भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत माहिती दिली. पोलिसांनीही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

सोसायटी व बिल्डर यांच्यात चार वर्षे वाद

दाभोलकर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, साईसृष्टी सोसायटी व बिल्डर सुभाष भोसले यांच्यात गेल्या चार वर्षांपासून वाद आहेत. सुभाष भोसले हे साईसृष्टी बिल्डिंगचे विकासक आहेत. चार वर्षांपूर्वी दाभोलकर यांनी या बिल्डिंगचे निकृष्ट बांधकाम करून फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार केली होती. तसेच सोसायटीमार्फत 2015 मध्ये सार्वजनिक सोयीसुविधा अंतर्गत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दिवाणी न्यायालय, कणकवली यांच्याकडे तक्रारही केली आहे. हा खटला न्यायालयात सुरू आहे. या खटल्यातील मागणीनुसार 4 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने या वादाच्या अनुषंगाने कोर्ट कमिशन नेमले असल्याचे दाभोलकर यांनी म्हटले आहे. याचा राग ठेवून भोसले याने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दाभोलकर यांना उद्देशून ‘तुला आता ठार मारतो’ असे म्हणत जानवली-साकेडी फाटय़ावर तेथे असलेल्या कुत्र्याच्या दिशेने पिस्तूलमधून दोन राऊंड फायर केले.

नियमित जातात मॉर्निंग वॉकला

दाभोलकर हे नियमित जानवली-साकेडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जातात. त्यांच्यासोबत दरवेळी सोसायटी सचिव प्रभाकर पावसकर व खजिनदार व्ही. एम. पाटील हे असतात. मात्र, रविवारी दाभोलकर एकटेच मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. काही अंतरावर जाऊन साईसृष्टी येथे फ्लॅटवर परतत असताना महामार्गालगत साकेडी फाटय़ावर स्पीड ब्रेकरच्या दरम्यान सुभाष भोसले हा आपली दुचाकी घेऊन दाभोलकर यांच्या मागोमाग आला. दुचाकीवरून उतरत दाभोलकर यांच्याकडे रागाने पाहत, त्यांना उद्देशून तेथे असलेल्या कुत्र्याकडे पाहून ‘तुला आता ठार मारतो,’ असे म्हणत काळपट रंगाच्या पिस्तूलमधून दोन राऊंड फायर केले. या घटनेने दाभोलकर हे हडबडून गेले. यानंतर भोसले याने तेथून पळ काढल्याचे दाभोलकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सहकाऱयांना दिली कल्पना

गोळीबाराचा आवाज ऐकून तेथील काहींचे लक्ष घटनास्थळाकडे गेले. दरम्यान, या घटनेनंतर घाबरलेल्या स्थितीत दाभोलकर यांनी आपल्या सहकाऱयांना ही घटना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत सांगितली. त्यानंतर पावसकर व पाटील यांनी तसेच दाभोलकर यांचे साडू नगरसेवक अभिजीत मुसळे, जानवली पोलीस पाटील मोहन सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटय़े, दामू सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती.

पोलीस घटनास्थळी दाखल

सकाळी 10.30 च्या सुमारास पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. ओटवणेकर, उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, धनंजय चव्हाण, हवालदार भगवान नागरगोजे, मंगेश बावदाने, शिवाजी नागरगोजे आदींनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. भोसले याने गोळी फायर करतेवेळी तो कुठे उभा होता? दाभोलकर हे त्याक्षणी कुठे थांबले होते? गोळीचा रोख कसा होता? त्या कुत्र्याला ती गोळी लागली का, याची कसून चौकशी पोलिसांनी केली.

जानवली : गोळीबार झाल्याच्या जागेचा पंचनामा करताना पोलीस. पप्पू निमणकर

पुंगळीचाही शोध सुरू

दरम्यान, ज्यावेळी भोसले याने गोळी फायर केली, त्यावेळी ती रस्त्यावर आपटल्याचा मोठय़ाने आवाज आल्याचे दाभोलकर यांनी सांगितले. रस्त्यावर तशाप्रकारची खूण दिसत होती. मात्र ती खूण गोळीचीच आहे का अन्य कसली, याबाबत पोलीस शोध घेत होते. तसेच पिस्तूलची बुलेट फायर केल्यानंतर त्याची पुंगळी त्या परिसरात पडल्याची शक्यता गृहित धरून पोलीस त्या पुंगळीचा शोध घेत होते.

अधिक तपासकामी न्यायालयात

घटनेनंतर दाभोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुभाष भोसले याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 506 (जीवे मारण्याची धमकी देणे) नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत अधिक तपासकामी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले.

Related posts: