|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रशांत किशोर संजदचे उपाध्यक्ष

प्रशांत किशोर संजदचे उपाध्यक्ष 

नितीश यांच्यानंतर पक्षात दुसरे स्थान : व्यूहनीती तज्ञ अशी ओळख

वृत्तसंस्था/ पाटणा

 निवडणूक विषयक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांना संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद मिळाले आहे. किशोर यांनी 16 सप्टेंबर रोजी संजदच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत भाग घेत राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केला होता. 11 ऑक्टोबर रोजी त्यांना संजद राज्य परिषदेचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले होते. पक्षाशी संबधित निर्णय प्रक्रियेप्रकरणी नितीश यांच्यानंतर त्यांचे स्थान राहणार असल्याचे मानले जातेय. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची व्यूहनीती तेच आखणार आहेत.

किशोर यांना नवी जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा पक्षाचे महासचिव के.सी. त्यागी यांनी केली. किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष बळकट होणार असून त्याला योग्य दिशा आणि वेग मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.

संजदमध्ये सामील होण्यापूर्वी प्रशांत हे निवडणूक व्यूहनीतिकार म्हणून काम पाहत होते. 2014 लोकसभा निवडणुकीत त्यांनीच मोदींच्या प्रचाराची व्यूहनीति तयार केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआला मात देऊन महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याचे शिल्पकार देखील प्रशांतच राहिले होते. या निवडणुकीपासूनच नितीश कुमार यांच्यासोबतची त्यांची जवळीक वाढू लागली होती.  2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससाठी काम केले होते, परंतु तेथे त्यांना अपयशाला तोंड द्यावे लागले होते.