|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ले न. प. च्या घोषवाक्य, बोधचिन्हाचे अनावरण

वेंगुर्ले न. प. च्या घोषवाक्य, बोधचिन्हाचे अनावरण 

नूतन सभागृहाचे 22 रोजी उद्घाटन, तर 24 रोजी मच्छीमार्केट इमारतीची पायाभरणी

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे सेवानिवृत्त प्राध्यापक व बोधचिन्हासाठीचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सुनील नांदोस्कर यांनी डिझाईन केलेल्या बोधचिन्हाचे व ‘जनहितं परम ध्येयम्’ या घोषवाक्याचे अनावरण बुधवारी न. प. च्या सांस्कृतिक भवनमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. न. प. च्या नूतन सभागृहाचे उद्घाटन सोमवारी 22 रोजी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते, तर नवीन मच्छीमार्केटचा पायाभरणी व कोनशिला समारंभ बुधवारी 24 रोजी बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

वेंगुर्लेचे सुपुत्र व जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. सुनील नांदोस्कर यांनी वेंगुर्ल्याचे ऐतिहासिक क्राफर्टमार्केट, डच वखार, धार्मिक स्थळे, आंबा, काजू, मासे आदी वास्तू व वस्तूंनी तयार करण्यात आलेले बोधचिन्ह व घोषवाक्याचे बुधवारी नगराध्यक्ष गिरप यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, विरोधी पक्षनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेविका कृतिका कुबल, सुमन निकम, स्नेहल खोबरेकर, शीतल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, आत्माराम सोकटे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, मुख्याधिकारी वैभव साबळे, अधीक्षक सुरेल परब आदी उपस्थित होते.

यावेळी सुनील नांदोस्कर यांचा गिरप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यातील अनेक न. प. चे लोगो आपण बनवून दिले. त्याबद्दल आपल्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. जन्मगाव असलेल्या वेंगुर्ले न. प.चेही बोधचिन्ह आपल्याकडून घडावे, असे आपल्याला नेहमी वाटत होते. ते स्वप्न पूर्ण झाले. आपण या बोधचिन्हात वेंगुर्ले शहराची वैशिष्टय़े दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असे नांदोस्कर यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

नूतन सभागृहाचे 22 रोजी उद्घाटन

न. प. च्या नूतन सभागृहाचे उद्घाटन सोमवारी 22 रोजी सर्व आजी-माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सभागृहाची आसन क्षमता 50 एवढीच असल्याने या कार्यक्रमाला नागरिकांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचे गिरप यांनी सांगितले.

मच्छीमार्केट इमारतीची 24 रोजी पायाभरणी

नूतन मच्छीमार्केट इमारतीची पायाभरणी व कोनशिला समारंभ बुधवारी 24 रोजी बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे गिरप यांनी सांगितले. त्यानंतर विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे.