|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चिवला बीच वादावर सामोपचाराने तोडगा

चिवला बीच वादावर सामोपचाराने तोडगा 

रापण संघ-जलक्रीडा व्यावसायिकांची संयुक्त बैठक : कॅप्टन संजय उलगमुगले यांची महत्वाची भूमिका

प्रतिनिधी / मालवण:

शहरातील चिवला वेळा येथील समुद्रात मासेमारी क्षेत्रात सुरू असलेल्या जलक्रीडा प्रकारामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यापुढे रापण पद्धतीच्या मासेमारी क्षेत्राबाहेर पॅरासेलिंग तसेच अन्य जलक्रीडा केल्या जातील, असे जलक्रीडा व्यावसायिकांनी स्पष्ट केले. त्यामुळे रापणकर मच्छीमार व जलक्रीडा व्यावसायिक यांच्यातील वाद अखेर सामंजस्याने मिटला.

चिवला वेळा येथील समुद्रात पारंपरिक रापणकर मासेमारी करतात. येथे समुद्रात जलक्रीडा व्यवसायही चालतो. मात्र, सध्या जलक्रीडा प्रकारातील पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंगसाठीच्या नौका रापण पद्धतीच्या मासेमारीच्या क्षेत्रातून जात असल्याने आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर बंदर कार्यालयात रापणकर मच्छीमार व जलक्रीडा व्यावसायिकांची आज सायंकाळी अधिकाऱयांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक झाली. यावेळी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उलगमुगले, बंदर अधिकारी सुषमा कुमठेकर, चिवला बीच वॉटरस्पोर्टस्चे अध्यक्ष मनोज मेतर, ताता वेंगुर्लेकर, रुजाय फर्नांडिस, विनोद वेंगुर्लेकर, चंद्रशेखर मयेकर, योगेश मंडलिक, भाई कासवकर यांच्यासह रेवतळेकर रापण संघ, रामा मणचेकर रापण संघ, महेश हडकर रापण संघ, न्यू रेवतळे रापण संघ, जुने रापण संघ, सांताक्रूझ रापण संघाचे विजय फाटक, बस्त्याव आल्मेडा, पावलू मेंडिस, रामा मणचेकर, महेश हडकर आदी मच्छीमार उपस्थित होते.

मासेमारी क्षेत्रात पॅरासेलिंग बंद

मच्छीमारांनी जलक्रीडा प्रकाराचा जो पिकअप पॉईंट आहे, तेथे जाण्यासाठी जलक्रीडा व्यावसायिक मासेमारी क्षेत्रातून नौका नेत असल्याने मासळी पळून जाते. शिवाय पॅरासेलिंगच्या नौकांचा आवाज मोठा असल्याने त्याचाही रापणीच्या मासेमारीवर परिणाम होत असल्याचे सांगितले. यावर जलक्रीडा व्यावसायिकांनी पिकअप पॉईंटच्या ठिकाणी जाणाऱया नौका यापुढे किनाऱयालगतच्या मार्गाने जातील तसेच पॅरासेलिंगच्या नौका रापण मासेमारी क्षेत्राबाहेरच असतील, असे स्पष्ट करण्यात आले. यावर मच्छीमारांनी पॅरासेलिंग जलक्रीडा डिसेंबरपूर्वीच सुरू करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. सध्या दिवाळी हंगाम असल्याने पॅरासेलिंग सुरू केले असून ते मासेमारी क्षेत्राबाहेरच सुरू ठेवले जाईल, असे स्पष्ट केले. या यशस्वी तोडग्यानंतर हा वाद सामंजस्याने मिटला. ही बैठक घेण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला होता, असे रापण संघाच्यावतीने सांगण्यात आले.

समाधानकारक तोडगा

दोन्ही व्यावसायिक हे मच्छीमारच आहेत. त्यामुळे रापण व जलक्रीडा व्यावसायिकांनी आपल्याला ज्या भागात व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली आहे, त्याच क्षेत्रात व्यवसाय करावा. दोघांनी समन्वयातून व्यवसाय केल्यास वाद होणार नाहीत, असे स्पष्ट करीत बंदर अधिकारी सुषमा कुमठेकर यांनी चिवला वेळा येथे जाऊन संबंधित व्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असा आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन उलगमुगले यांनी कुमठेकर यांना दिला.

डिसेंबरनंतर पर्यटनासाठी खुला

डिसेंबरनंतर चिवला येथे समुद्रात जलक्रीडा व्यवसाय करण्यास रापण संघाने सहमती दर्शविली आहे. डिसेंबरपर्यंत रापण संघांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने व्यवसाय करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही वाद न होता ही बैठक यशस्वी झाली. चिवला बीच रापण संघाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्यामुळे संभाव्य वादावर पडदा पडला आहे.

Related posts: