|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » डावा कालवा दुरुस्तीचे काम तातडीने

डावा कालवा दुरुस्तीचे काम तातडीने 

कार्यकारी अभियंत्यांची ग्वाही : शेतकऱयांचे उपोषण मागे

वार्ताहर / दोडामार्ग:

तिलारी डाव्या कालव्याच्या दुरवस्थेचे घोटगेवाडी येथील काम तातडीने सुरू करण्याचे लेखी आश्वासन तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. धाकतोडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दिल्यावर मंगळवारी उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.

तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे घोटगे, घोटगेवाडी, परमे, कोनाळकट्टा येथील शेतकऱयांच्या शेतीला पाणी देण्याच्या हंगामात पाणी नसल्याने येथील शेतकऱयांच्या शेती बागायती करपून गेल्या. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱयांनी तिलारी येथे सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणस्थळी पाटबंधारे विभागाच्या एकाही अधिकाऱयाने भेट दिली नव्हती. मंगळवारी उशिरा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धाकतोडे यांनी उपोषणकर्त्यांची सायंकाळी उशिरा तिलारी येथे भेट घेऊन डाव्या कालव्याच्या घोटगेवाडी येथे झालेल्या दुरवस्थेचे काम तातडीने सुरू करण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी घोटगेवाडी सरपंच भालचंद्र कुडव, कोनाळ सरपंच पराशर सावंत, संतोष दळवी, कमलेश पर्येकर, अतुल कर्पे, सत्यम सावंत, आशिष तेली, गुरुदास दळवी, यशवंत दळवी, उमेश वाडकर, दिलीप पांगम, सुनील संजय सातार्डेकर, पंचायत समिती सदस्य बाळा नाईक, रंगनाथ गवस, सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, प्रवीण गवस, दीपक गवस व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

संपादीत जमिनींचा मोबदला द्या!

दरम्यान, तिलारी येथे उपोषणास बसलेल्या शेतकऱयांनी आम्ही कालव्यासाठी आमच्या जमिनी दिल्या आहेत. त्या जमिनींचा मोबदला आम्हाला अद्यापर्यंत मिळालेला नाही. त्या जमिनींचा मोबदला मिळण्यासाठी आम्ही सर्व जमीन मालकांनी प्रस्तावदेखील केला आहे. त्याची रक्कम आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली.

कालव्यांचे निकृष्ट काम

पं. स. सदस्य बाळा नाईक व रंगनाथ गवस म्हणाले, तिलारी कालव्यांची डागडुजी करण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले. मात्र, पाणी सोडल्यावर कालवे फुटण्याची चिन्हे असल्याने पाणी सोडले जात नाही. विनाकारण शेतकऱयांची फसवणूक करून तिलारी विभागाचे अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत.

ठेकेदारांकडून शेतकऱयांना धमक्यांचे कॉल

कालव्यांच्या झालेल्या कामांची माहिती माहितीच्या अधिकाराखाली घेतली असता तुमचेच काही अधिकारी आम्ही माहिती मागतो, याची कल्पना संबंधित ठेकेदारांना देतात. ठेकेदारांकडून शेतकऱयांना कॉल करून धमकी दिली जाते, असे उपोषणकर्त्यांनी धाकतोडे यांना सांगितले. त्यामुळे अधिकारी व ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप शेतकऱयांनी करत हा प्रकार खपवून घेणार नाही. असे झाल्यास यापुढे तीव्र उपोषण करू, असा इशाराही देण्यात आला.

Related posts: