|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » कोहली, रोहितची दमदार शतके

कोहली, रोहितची दमदार शतके 

पहिल्या वनडेत भारताचा 8 गडय़ांनी दणदणीत विजय

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

सामनावीर व कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनी झळकवलेली शतके आणि दुसऱया गडय़ासाठी त्यांनी केलेली विक्रमी द्विशतकी भागीदारी मुळे भारताने येथे झालेल्या पहिल्या वनडेत विंडीजवर 8 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कोहलीने 140 तर रोहितने नाबाद 152 धावांचे योगदान दिले. विंडीजच्या हेतमेयरचे चमकदार शतक मात्र वाया गेले. दुसरा सामना 24 रोजी विशाखापटणम येथे होणार आहे.

प्रथम फलंदाजी मिळाल्यावर शिमरॉन हेतमेयरचे चमकदार शतक आणि पॉवेलचे अर्धशतक यांच्या बळावर विंडीजने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 322 धावा जमवित भारतासमोर 323 धावांचे आव्हान ठेवले. भारताच्या यजुवेंद्र चहलने प्रभावी मारा करीत 3 बळी मिळविले. त्यानंतर विंडीजच्या निष्प्रभ माऱयाचा समाचार घेत 42.1 षटकांतच 2 बाद 326 धावा जमवित विजयाचे उद्दिष्ट सहजपणे गाठले.  धवन लवकर बाद झाल्यानंतर रोहित व विराट यांनी आक्रमक फलंदाजी करीत दुसऱया गडय़ासाठी 246 धावांची विक्रमी द्विशतकी भागीदारी करून विजयासमीप झेप घेतली. कोहलीने वनडेतील 36 वे, विंडीजविरुद्धचे पाचवे आणि कर्णधार या नात्याने 14 वे शतक नोंदवले. याशिवाय मायदेशातील 15 वे, धावांचा पाठलाग करतानाचे त्याचे हे 22 वे शतक आहे. त्याचा जोडीदार रोहितने 20 वे वनडे शतक नोंदवले. कोहलीने 107 चेंडूंच्या खेळीत 21 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 140 धावा तडकावल्या तर रोहितने 117 चेंडूत 15 चौकार, 8 षटकारांची आतषबाजी करीत नाबाद 152 धावा झोडपल्या. बिशूने कोहलीला यष्टिचीत केल्यानंतर अंम्बाती रायुडूच्या साथीने अभेद्य 70 धावांची भागीदारी करून रोहितने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रायुडू 22 धावांवर नाबाद राहिला. त्याने 26 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार मारला. थॉमस व बिशू या दोघांनाच एकेक बळी मिळाला.

हेतमेयरचे शानदार शतक

21 वषीय डावखुऱया हेतमेयरच्या नेतृत्वाखाली विंडीजने 2016 मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. त्याने येथील सामन्यात आक्रमक फटकेबाजी करीत भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढविला आणि तिसऱया वनडे शतकाची नोंद केली. त्याने 78 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने त्याने 106 धावा फटकावल्या.

भुवनेश्वर कुमार व जसप्रित बुमराह या प्रमुख गोलंदाजांच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाज विंडीजच्या धावगतीला रोखण्यात कमी पडले. भुवनेश्वर व बुमराह या दोघांनाही पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय गोलंदाजी प्रभावी वाटत नव्हती तर क्षेत्ररक्षणातही काही चुका झाल्या. कसोटीत एकतर्फी विजय मिळाल्यामुळे विंडीजला या सामन्यात कमी लेखत असल्याचे एकप्रकारे जाणवत होते. हेतमेयरने 41 चेंडूत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले आणि रोवमन पॉवेल (22) व कर्णधार जेसन होल्डर (38) यांच्यासमवेत दोन अर्धशतकी भागीदारीही केल्या. नंतर त्याने मोहम्मद शमीला एक्स्ट्रॉ कव्हरवरून षटकार ठोकून शतक पूर्ण केले. वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याने ताकदीचा वापर केला तर चहल व जडेजा यांची फिरकीही त्याने समर्थपणे खेळून काढील. अखेर जडेजानेच त्याला शतकानंतर बाद केले.

कसोटी मालिका 2-0 अशी एकतर्फी गमविल्यामुळे विंडीजसमोर पत मिळविण्याचेही आव्हान होते आणि भारताकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर जवळपास सव्वातीनशेची मजल मारून त्यांनी चांगले प्रयत्नही केल्याचे दिसून आले.  सामन्याच्या आदल्या दिवशी तीनशेहून अधिक धावसंख्या ही वनडेतील प्रमाण धावसंख्या बनली असल्याचे विंडीज कर्णधार होल्डरने म्हटले होते आणि त्याच्या संघसहकाऱयांनी त्याचे म्हणणे खरेही करून दाखविले. हेमराज लवकर बाद झाल्यानंतर सलामीवीर कायरन पॉवेलने जलद सुरुवात करून देताना शाय होपमसवेत दुसऱया गडय़ासाठी 67 धावांची भागीदारी केली. पॉवेलने 39 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 51 धावा फटकावल्या. होपने 51 चेंडूत 32 धावा काढल्या. विंडीजने नंतर तीन गडी झटपट गमविले. मात्र हेतमेयरने शानदार फलंदाजी करीत संघाला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली. 200 व्या सामन्यात खेळणारा मार्लन सॅम्युअल्स मात्र दुसऱयाच चेंडूवर शून्यावर बाद झाला. याशिवाय देवेंद्र बिशूने 26 चेंडूत नाबद 22, केमर रॉचने 22 चेंडूत नाबाद 26 धावा फटकावत नवव्या गडय़ासाठी अभेद्य 44 धावांची भागीदारी केली. भारताच्या यजुवेंद्र चहलने 41 धावांत 3, शमीने 81 धावांत 2, जडेजाने 66 धावांत 2 व खलील अहमदने एक बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज – के. पॉवेल 51 (39 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), हेमराज 9 (15 चेंडूत 2 चौकार), शाय होप 32 (51 चेंडूत 2 चौकार), सॅम्युअल्स 0 (2 चेंडू), हेतमेयर 106 (78 चेंडूत 6 चौकार, 6 षटकार), रोवमन पॉवेल 22 (23 चेंडूत 4 चौकार), होल्डर 38 (42 चेंडूत 5 चौकार), नर्स 2 (2 चेंडू), बिशू नाबाद 22 (26 चेंडूत 3 चौकार), रॉच नाबाद 26 (22 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 14, एकूण 50 षटकांत 8 बाद 322.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-19, 2-84, 3-86, 4-114, 5-188, 6-248, 7-252, 8-278.

गोलंदाजी : शमी 10-0-81-2, उमेश यादव 10-0-64-0, खलील अहमद 10-0-64-1, चहल 10-0-41-3, जडेजा 10-0-66-2.

भारत : रोहित शर्मा नाबाद 152 (117 चेंडूत 15 चौकार, 8 ष्घ्टकार), धवन 4 (6 चेंडूत 1 चौकार), कोहली 140 (107 चेंडूत 21 चौकार, 2 षटकार), रायुडू नाबाद 22 (26 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 8, एकूण 42.1 षटकांत 2 बाद 326.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-10, 2-256.

गोलंदाजी : रॉच 7-0-52-0, थॉमस 9-0-83-1, होल्डर 8-0-45-0, नर्स 7-0-63-0, बिशू 10-0-72-1, हेमराज 1.1-0-9-0.

पाँटिंगनंतर कोहली दुसऱया क्रमांकावर

कर्णधार या नात्याने सर्वाधिक शतके नोंदवण्याच्या बाबतीत कोहली आता दुसऱया क्रमांकावर असून त्याने 14 शतके नेंदवली आहेत. ऑस्ट्रेलियाचा पाँटिंग सर्वाधिक 22 शतके नोंदवत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र कोहलीचा शतकाचा sवेग सरस असून त्याने केवळ 50 डावात ही शतके नोंदवली तर पाँटिंगला 22 शतकांसाठी 220 डाव खेळावे लागले होते.

कर्णधार            शतके     डाव

पाँटिंग, ऑस्ट्रेलिया         22        220

कोहली, भारत   14        50

डीक्हिलियर्स, द.आफ्रिका 13        98

गांगुली, भारत   11        143

जयसूर्या, लंका   10        118.

 

विक्रमवीर विराटचे 36 वे वनडे शतक

विंडीजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने शानदार शतकी खेळी साकारली. त्याचे हे वनडेतील 36 वे शतक ठरले. विराटने 204 सामन्यात ही कामगिरी साकारली आहे. आता, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱयांच्या यादीत सचिन तेंडुलकर (49) पहिल्या स्थानी असून विराट कोहली (36) दुसऱया स्थानी आहे.

याशिवाय, या कामगिरीसह त्याने 2018 वर्षात क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात मिळून 2000 धावा करण्याचा विक्रम केला. यंदाच्या वर्षात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच विराटने सलग दुसऱया वर्षी हा पराक्रम केला आहे. त्याने गतवर्षी 2818 धावा फटकावल्या होत्या. विशेष म्हणजे, एका वर्षात सर्वाधिक वेळा 2000 धावांचा पल्ला पार करणाऱया भारतीय  फलंदाजामध्ये विराटने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 5 वेळा एका वर्षात 2000 धावा केल्या होत्या. विराटने या विक्रमाशी बरोबरी साधली. हा पल्ला सर करताना त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या (4) विक्रमाला मागे टाकले.