|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कोण रे हा बाबा आला येथें?

कोण रे हा बाबा आला येथें? 

अक्रूराला पाहून तेथे असलेले सर्व गोपाळ पेंद्याला म्हणाले, हा कोण बाबा येथे आला आहे? आपल्या कान्होबाच्या हा का पाया पडत आहे? तो कृष्णाजवळ काही मागतो आहे काय ते आम्हाला सांग. त्यानंतर अक्रूराला घेऊन सवंगडय़ांसह बलराम व कृष्ण घरी आले आणि त्यानी अक्रूराला नंदाला भेटविले. नंदाने अक्रूराची मधुपर्कादि विधीने पूजा केली आणि तो म्हणाला-आजचा हा दिवस आम्हाला भाग्याचा आहे. अक्रूरासह सर्व लोक भोजनाला बसले, नंतर नंदाने अक्रूराला मथुरेचे कुशल विचारले.

अक्रूर आणि श्रीकृष्णाच्या या पहिल्या भेटीबाबत भागवताचार्य वै. डोंगरे महाराज यांनी सुंदर चिंतन मांडले आहे, ते असे-भगवंतांनी अक्रूराचे मनोरथ पूर्ण केले. भगवंतासाठी केलेले शुभसंकल्प ते अवश्य पूर्ण करीत असतात. रोज कल्पना करा की मृत्यूच्या वेळी भगवंत तुम्हाला घ्यायला यावा. जर वाईट संकल्प सिद्ध होतात तर चांगले संकल्प का सिद्ध होणार नाहीत? दंडवत प्रणाम करीत करीत अक्रूर गोशाळेत आले. त्यांनी कल्पना केलीच होती की श्रीकृष्णांचे दर्शन तेथेच होईल. ते म्हणू इच्छित होते की, मी पापी आहे आणि श्रीकृष्णाला शरण आलो आहे. परंतु त्यांचा गळा दाटून आला. ते एक शब्दही बोलू शकले नाहीत आणि भावावेशांत भान हरपून श्रीकृष्णाच्या चरणांवर जाऊन पडले. श्रीकृष्णाला नमस्कार केला. परमात्म्याचे डोळे तर नेहमीच प्रेमार्द असतात. त्यांनी पाहिले की अक्रूर आपल्याला शरण आला आहे. अक्रूरांची इच्छा होती की ज्यावेळी ते नमस्कार करतील त्याच वेळी भगवंताची दृष्टी त्यांच्यावर पडावी जेणेकरून त्यांचे हृदय शुद्ध होऊन पाप करण्याची इच्छाच न व्हावी. त्यांची ही पण इच्छा होती की प्रभूंनी आपल्या डोक्मयावर हात ठेवावा. प्रभूंनी आपला वरदहस्त अक्रूरांच्या डोक्मयावर ठेवून त्यांना उभे केले. अक्रूरांनी तर विचार केलेला होता कीं कान्हा जेव्हा त्यांना काका म्हणून हाक मारील तेव्हाच ते उभे राहतील. पण माझ्यासारख्या पाप्याला ते काका का म्हणून म्हणतील? ते जर मला आपलेसे करणार नाहीत तर ब्रह्मसंबंध पक्का होणार नाही. भगवंत कोणालाही घाईने आपलेसे करीत नाहीत. जीव मंदिरात जाऊन म्हणतो कीं तो त्यांचा आहे. परंतु घरी आल्यावर तो बायकोला म्हणतो कीं तो तिचाच आहे. असा हा जीव अतिमूर्ख आहे. भगवंतांनी अक्रूराचे मनोगत जाणून घेतले. त्यांनी विचार केला, जर काका म्हटल्याने अक्रूरांना सुख होत असेल तर असे म्हणायला काय अडचण आहे? जीव ज्या कोणत्या भावाने आणि संबंधाने मला भजतो त्याच भावाने आणि संबंधाने मी पण त्याला भजतो. मी जीवाचा पिताही आहे आणि पुत्र पण. ईश्वराला महान का समजले जाते? याचे कारण असे की तो सर्वसत्ताधीश असूनही दुराग्रही नाही, अनाग्रही आहे. जीवच दुराग्रही आहे. जीवाला थोडा सन्मान किंवा संपत्ती मिळाली की तो दुराग्रही होऊन जातो.

Ad. देवदत्त परुळेकर

Related posts: