|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » निवडणुकीनंतरच भारताला मैत्रीचा प्रस्ताव

निवडणुकीनंतरच भारताला मैत्रीचा प्रस्ताव 

पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे विधान : अफगाणिस्तानसोबत शांततेची इच्छा

वृत्तसंस्था/  रियाध

 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच भारताच्या दिशेने पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला जाणार आहे. शेजारी देशातील निवडणुकीत पाकिस्तान हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने नवी दिल्लीने चर्चेचा प्रस्ताव फेटाळल्याचे माझे मानणे असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी म्हटले आहे.

पाकिस्तान स्वतःच्या सर्व शेजारी आणि विशेषकरून भारत तसेच अफगाणिस्तान सोबत शांततेचे संबंध राखू इच्छितो. भारतासोबत शांततेमुळे दोन्ही देशांमधील शस्त्रास्त्रस्पर्धा थांबून साधनसंपत्तीचा वापर मानवी विकासासाठी करण्यास बळ मिळेल, असे इम्रान यांनी रियाध येथील फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरमला संबोधित करत म्हटले आहे.

अफगाणिस्तानात शांतता नांदू लागल्यास पाकिस्तानला द्विपक्षीय आर्थिक तसेच व्यापारी कार्यांसाठी मध्य आशियाई देशांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. आपण भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला होता, परंतु भारताने याला नकार दिल्याचा दावा त्यांनी केला.

इम्रान खान यांनी ऑगस्ट महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दोन्ही देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक आयोजित करण्याची सूचना केली होती. भारताने प्रस्ताव मान्य केल्याच्या काही तासांतच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची हत्या केली होती. या कारणामुळे भारताने ही बैठक रद्द केली होती. भारतात सार्वत्रिक निवडणूक पार पडताच पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करणार असल्याचे इम्रान यांनी सांगितले.