|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » इरफान खान सात महिन्यांच्या उपचारानंतर भारतात परतणार

इरफान खान सात महिन्यांच्या उपचारानंतर भारतात परतणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास सात महिन्यांच्या उपचारानंतर इरफान लवकरच भारतात परतणार आहे. इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन टय़ूमर neuroendocrine tumour हा दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते. त्याच्या उपचारासाठी तो गेल्या सात महिन्यांपासून लंडनमध्ये होता.

मागील कित्येक दिवसांपासून इरफान न्यूरोएन्डोक्राइन टय़ूमर या दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या प्रकृतीविषयी अनेकांनीच चिंता व्यक्त केली आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. इरफानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे तो लवकरच ‘हिंदी मिडियम’ या चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. येत्या एक- दोन दिवसांत तो मुंबईत परतणार असून त्यानंतर लगेच शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे इरफानच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी ‘हिंदी मिडियम’चे निर्माते इरफानला भेटण्यासाठी लंडनला गेले होते. त्यांनी इरफानला चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यानंतर त्याने सिक्वलमध्ये काम करण्यासाठी होकार कळवला. 2017 साली प्रदर्शित झालेला इरफानचा ‘हिंदी मिडियम’ बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर इरफानसोबत झळकली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या सिक्वलची चर्चा होती पण इरफानच्या प्रकृतीमुळे सिक्वलमध्ये दुसऱया अभिनेत्यासाठी विचार केला जाणार होता. या सिक्वलचे दिग्दर्शन होमी अदजानिया करणार आहे.

Related posts: