|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रामीण रुग्णालयासमोर ‘स्वाभिमान’चे जनआक्रोश आंदोलन

ग्रामीण रुग्णालयासमोर ‘स्वाभिमान’चे जनआक्रोश आंदोलन 

वार्ताहर / मालवण:

 येथील ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱयांनी मंगळवारी ग्रामीण रुग्णालयासमोर जनआक्रोश आंदोलन छेडले. स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांनी शासन व सत्ताधारी आमदार, खासदार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दुपारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी ग्रामीण रुग्णालयातील सुविधा व डॉक्टर्स उपलब्ध करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांना दिले. परंतु येत्या आठ दिवसांत डॉक्टर उपलब्ध न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांनी दिला आहे.

  यावेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, महेश जावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, जि. प. सदस्या सरोज परब, पं. स. सदस्य अजिंक्य पाताडे, कृष्णनाथ तांडेल, अशोक सावंत, डॉ. जितेंद्र केरकर, सरपंच स्नेहा केरकर, चारुशीला आचरेकर, बाबा परब, जयमाला मयेकर, नगरसेवक यतीन खोत, सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सुभाष लाड, मंदार लुडबे, आबा हडकर, महेश बागवे, भाई मांजरेकर, अभय कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  पुरेसा औषधसाठा, स्त्राrरोग तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकाऱयांची वर्ग-एक, दोनची रिक्त पदे, आठवडय़ातून एकदा विविध अवयवांचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत तसेच रुग्णालयातील असुविधांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठीही हे जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते. दुपारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांची भेट घेतली. यावेळी स्वाभिमानच्या पदाधिकाऱयांनी ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत चाकोरकर यांना धारेवर धरले. डॉ. चाकोरकर यांनी एनआरएचएम अंतर्गत तज्ञ डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली होती.