|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » यशोदेच्या मनाची तगमग

यशोदेच्या मनाची तगमग 

कान्होबा आणि बलराम यांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर आला आहे हे वर्तमान जेव्हा यशोदेला समजले तेव्हा तिचे तर हृदयच खचून गेले. हा अक्रूर, अक्रूर नसून क्रूरच आहे. माझ्या बाळकृष्णाला जाऊ देऊ नका. तो जाईल तर सगळे गोकुळ उजाड होऊन जाईल. तो नसेल तर गाई देखील खाणे पिणे सोडून देतील. जर घेऊनच जायचे असेल तर बलरामाला घेऊन जा, कन्हैयाला नाही. ऐकले आहे कीं मथुरेतील बाया जादू करणाऱया असतात. काही असा तोडगा करतील की माझा कान्हा परत येऊ शकणार नाही. यशोदा नंदांनासुद्धा विनवणी करू लागली-जर तुम्हाला मथुरेला जायचे असेल तर जा, परंतु बाळकृष्णाला घेऊन जाऊ नका. त्याचा तेथे सांभाळ कोण करील? तो फारच लाजाळू आहे. तो उपाशी असला तरी काही मागत नाही. त्याची मनधरणी करून कोण खायला घालील? मुलगा कितीही मोठा झाला तरी आईला तो लहानच आहे असे वाटत राहते. नंदबाबा यशोदेला धीर देऊन समजावू लागले-कन्हैया आता अकरा वर्षांचा तर झाला. आता तू किती दिवस त्याला घरात ठेवशील? त्याने बाहेरचे जगसुद्धा पहायला हवे. मी आता त्याला गोकुळचा राजा बनण्यालायक करू इच्छितो. आम्ही दोनचार दिवस मथुरेंत राहून हिंडून फिरून परत येऊ. तू काळजी करू नकोस.

तरी पण यशोदेचे मन मानीत नाही. माझ्या बाळाला मी माझ्या डोळय़ापासून दूर कशी करू? मी या वृद्ध अवस्थेत कान्हय़ासाठीच तर जगत आहे. हाच तर आधार आहे माझा. रात्र झाली. सगळे झोपी गेले, परंतु यशोदेची झोप आज पार उडून गेली होती. न जाणो उद्या काय होईल. कान्हा निघून गेला तर मी एकटी कशी जिवंत राहीन? ती बाहेर अंगणात येऊन हुंदके देऊन रडू लागली.

कान्हय़ाने डोळे अचानक उघडले तर शेजेवर आई नव्हती. तो तिला इकडे तिकडे शोधू लागला. त्याला आई अंगणात रडत असलेली दिसली. तो आईच्या जवळ बसला आणि गळय़ात हात घालून तिचे डोळे पुसत पुसत रडण्याचे कारण विचारू लागला. तू का रडते आहेस? तू रडू लागलीस म्हणजे मला फार वाईट वाटते. कान्हय़ाचे बोलणे ऐकून आईला जरा बरे वाटले. ती म्हणू लागली-तसं काही विशेष नाही. तू उद्या जाणार आहेस म्हणून माझ्या डोळय़ांतून अश्रुपूर वाहात आहे. मला सोडून तू कुठे जाऊ नको रे! तुझ्याच आधाराने मी जिवंत राहत आहे. कन्हैया मातेला आश्वासन देऊ लागला. का काळजी करते आहेस तू? मी जरूर परत येईन. पण हे नाही सांगितले की केव्हा परत येईन.

आईने पण विचारले नाही. कृष्णाचे परत येण्याचे वचन ऐकून ती प्रसन्न झाली. यशोदा कृष्णाला म्हणाली-आता आपण निजू या हं! दोघेही एकाच शेजेवर झोपी गेले. आज श्रीकृष्णाने यशोदेच्या हृदयात प्रवेश केला. आता तो आतच दिसत राहील.

Related posts: