|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणी सुरु करण्यासाठी अध्यादेश हाच पर्याय

खाणी सुरु करण्यासाठी अध्यादेश हाच पर्याय 

प्रतिनिधी /पणजी :

राज्यातील खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी अध्यादेश काढणे अत्यंत गरजेचे आहे. मंत्रिमंडळ सल्लागार समितीत असताना अध्यादेश काढून खाणी सुरु कराव्या असे सांगणारा आपण पहिला मंत्री आहे. त्यामुळे आता अध्यादेश काढण्यावर भर द्यायला हवा. आपण लवकरच दिल्लीला जाणार असून त्यावेळी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभूंना भेटून याबाबत बोलणार असल्याचे काल नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी खाण अवलंबितांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

गोवा मायनिंग पिपल्स प्रंटच्या शिष्टमंडळाने काल पुती गावकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली. खाण व्यवसाय प्रकरणात आता सरदेसाई यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष संतोषकुमार सावंत व दुर्गादास कामत यांची उपस्थिती होती. खाणबंदीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी नपेक्षा अशी पावले उचलावी लागतील जी न्यायालयालाही आवडणार नाही. या गोष्टी केल्या नाही तर लोकांना स्पष्ट सांगावे लागेल की आम्ही लोकासोबत नाही. त्यामुळे आता सरकारने स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे. खाण अवलंबितांच्या भावनांशी खेळ केला जाऊ नये. 27 रोजी आपण खाजगी भेटीसाठी दिल्लीला जाणार. त्यावेळी आपण केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खाण व्यवसायाचा विषय कशा पद्धतीने लटकला आहे व त्यामुळे खाण अवलंबितांना त्याचे परिणाम कसे भोगावे लागत आहे हे पुती गावकर यांनी मंत्री सरदेसाई यांच्यासमोर स्पष्ट केले. लाखो लोक आज याचे खाणबंदीचे बळी ठरले आहेत. लोकसभेत अध्यादेश काढून खाणी सुरु करणे हाच त्यावरील उपाय असल्याच्s गावकर यांनी सांगितले. मंत्री विजय सरदेसाई यांनी या विषयात हस्तक्षेप करून केंद्राकडे न्यावा जेणेकरून खाण व्यवसाय सुरु होऊ शकेल अशी विनंती गावकर यांनी केली. खाण कंपन्यांमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर संबंधित व्यवसायही बंद पडले आहेत. खाण पट्टय़ातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. सरदेसाई यांनी याप्रकरणी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर गरज भासल्यास शिष्टमंडळाच्या नेत्यांनाही बोलावून घेऊ असे स्पष्ट केले. खाण पट्टय़ातील लोकांची अवस्था काय आहे हे आपण जवळून पाहिले आहे. त्यामुळे या विषयावर आपण गंभीर असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.