|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भाजप-संजद यांच्यातील जागावाटप निश्चित

भाजप-संजद यांच्यातील जागावाटप निश्चित 

बिहारमध्ये समान जागा मिळणार : लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पुढील वर्षी होणाऱया लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये भाजप-संजद यांच्यात जागावाटपाचे सूत्र शुक्रवारी निश्चित झाले आहे. या सूत्राची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शाह आणि संजदचे अध्यक्ष तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. राज्यात भाजप आणि संजद हे दोन्ही पक्ष समान जागा लढविणार असून उर्वरित सहकारी पक्षांना देखील ‘योग्य’ जागा दिल्या जाणार आहेत. मतदारसंघांची नावे आणि अन्य तपशील 2-3 दिवसांमध्ये घोषित केला जाणार आहे. नितीश कुमार यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील चर्चा केली.

बिहारमध्ये संजद आणि भाजप समान जागा लढविणार आहेत. उर्वरित सहकारी पक्षांना देखील योग्य जागा मिळतील. रालोआच्या घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. उपेंद्र कुशवाह आणि रामविलास पासवान देखील सोबत राहणार आहेत. कोणताही नवा सहकारी पक्ष आघाडीत दाखल होतो, तेव्हा सर्वांच्या जागांच्या हिस्सेदारीत घट होत असल्याचे महत्त्वपूर्ण विधान शाह यांनी यावेळी केले.

बिहारमध्ये भाजप-संजद दोघेही समान जागा लढवतील. उर्वरित जागांसाठीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 2-3 दिवसांमध्ये कोणाला किती जागा आणि कोणती जागा मिळणार याची घोषणा केली जाणार असल्याचे नितीश यांनी सांगितले. रालोआच्या मदतीने संजदला स्वतःचे बळ वाढविण्याची संधी मिळणार आहे. त्यातून  विधानसभा निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.

मागील निवडणूक

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून 2014 मध्ये रालोआने 31 जागांवर विजय मिळविला होता. 2014 मध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. बिहारमध्ये एकटय़ा भाजपनेच 22 जागांवर विजय नेंदविला होता. भाजप मागीलवेळी विजयी ठरलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करू शकणार नाही हे शुक्रवारच्या घोषणेमुळे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत भाजपमध्ये नाराजीसत्र तसेच बंडखोरी होण्याची शक्यता फेटाळली जाऊ शकत नाही.

Related posts: