|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मासळी घेऊन आलेले पन्नास ट्रक माघारी

मासळी घेऊन आलेले पन्नास ट्रक माघारी 

एफडीएची मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्याचा परिणाम

प्रतिनिधी / मडगाव

अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न केल्याने कारवारमार्गे मासे घेऊन गोव्यात येणारे सुमारे 50 ट्रक पोलिसांनी पोळे चेक नाक्यावर अडविले व हे ट्रक परत माघारी पाठवून दिले. शनिवारी पहाटे हे ट्रक गोव्याच्या हद्दीत प्रवेश करीत असताना, पोलिसांनी रोखून धरले. त्यामुळे पोळे चेक नाक्यावर ट्रक चालक व पोलीस यांच्यात काहीवेळ संघर्ष झाला. मात्र, पोलीस आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. दरम्यान, मडगावच्या घाऊक मासळी विक्रेत्या संघटनेने 1 नोव्हेंबरपासून मासळीची आयात स्वतःहून बंद करणार असल्याचे काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शुक्रवार अन्न आणि औषध प्रशासनालयाने परिपत्रक जारी करून मार्गदर्शन तत्त्वे जारी केली व या मार्गदर्शन तत्त्वांची त्वरित अंमलबजावणी करण्याचा आदेश दिले. त्याप्रमाणे शनिवारी पहाटे पोळे चेक नाक्यावर गोव्यात मासळी घेऊन येणारे ट्रक पोलिसांनी अडविले. त्यामुळे ट्रक चालक व पोलीस यांच्यात बराच संघर्ष झाला. या ट्रक चालकांनी आपल्या समर्थकांना बोलावून घेतले, त्यामुळे बराच तणाव निर्माण झाला. शेवटी कर्नाटक पोलीस देखील पोळे चेक नाक्यावर मध्यस्तीसाठी आले. पण, गोवा पोलीस आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. जोपर्यंत मासळी व्यवसायातील लोक एफडीएकडे रितसर नोंदणी करत नाहीत तसेच मासळीची इन्सुलेटेड वाहनांतून वाहतूक करीत नाही तोवर गोव्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

अगोदर कल्पना द्यायला हवी होती

गोव्यात दररोज मासळी घेऊन येणाऱया ट्रक चालकांना किंवा त्यांच्या मालकांना एफडीएने जारी केलेल्या मार्गदर्शन तत्त्वांची अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती. अशी कल्पना दिली नसल्याने, आम्ही मासळी घेऊन आलो. जर एफडीएच्या मार्गदर्शन तत्त्वांची कल्पना असती तर आम्ही काही तरी व्यवस्था केली असती किंवा आलोच नसतो असे ट्रक चालकांनी स्पष्ट केले. एफडीएने मार्गदर्शन तत्त्वे जारी करून धड एक दिवसांची सुद्धा मुदत दिली नसल्याने, त्यांनी एफडीएच्या कारभारावर जोरदार टीका केली.

गोवा पोलीस काही केल्या प्रवेश देत नसल्याने शेवटी मासळी घेऊन आलेले ट्रक माघारी फिरले. ज्या ट्रकांना इन्सुलेटेडची व्यवस्था होती असे सात-आठ ट्रक मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात दाखल झाले. पण, उद्यापासून शेजारील राज्यांतून येणारे मासळीचे ट्रक गोव्यात येण्याची शक्यता कमी असल्याने, गेंवेकरांना पुन्हा एकदा मासे मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शनिवारी पहाटे मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात स्थानिक मच्छीमाऱयांनी पकडलेली मासळी आली होती. पण, ही मासळी अवघ्या काही वेळातच संपली. त्यामुळे ग्रामीण भागात मासळी घेऊन जाणाऱया पिकअप किंवा अन्य वाहनांतून मासे विक्री करणाऱयांची प्रचंड गैरसोय झाली. त्यात एसजीपीडीएच्या मार्केट संकुलातील मासळी मार्केटात सुद्धा नेहमी सारखी गर्दी आढळून आली नाही.

फिश मिल तसेच माशांची निर्यात करणाऱया कंपन्यांना मात्र, नेहमी सारखी मासळी उपलब्ध झाली. फिश मिल व माशांची निर्यात करणाऱया कंपन्यासाठी मासे घेऊन येणाऱया ट्रकांना पोलिसांनी गोव्यात येण्याची मोकळीक दिली होती.

…तर 1 नोव्हेंबरपासून मासळीची आयात बंद

एफडीए व आरोग्य खाते जे आदेश जारी करतात, त्याची अंमलबजावणी करणे सर्वांनाच शक्य नाही. मासळीच्या व्यवसायात असलेल्या लोकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहे. फॉर्मेलिनच्या मुद्दावरून राजकारण जास्त होत आहे. संबंधितांकडे चर्चेसाठी वेळ मागितली तरी ती दिली जात नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून राज्याच्या मुख्य सचिवांकडे घाऊक मासळी विक्रेत्यांनी वेळ मागितली आहे. त्यांनी जर वेळा दिला व तोडगा काढला तर ठिक अन्यथा 1 नोव्हेंबरपासून मासळी आयात पूर्णपणे बंद केली जाणार असल्याचा इशारा मडगावच्या घाऊक मासळी विक्रेता संघटनेने पत्रकार परिषदेत दिला.

मासळी प्रश्नी राजकारण

फॉर्मेलिनयुक्त मासळी गोव्यात कोणत्याच परिस्थितीत नको. एफडीएची मार्गदर्शन तत्त्वे चांगली असेल परंतु, त्याची अंमलबजावणीसाठी थोडा कालावधी हवा होता, तो दिलेलाच नाही. शुक्रवारी आदेश जारी करून शनिवारी त्याची अंमलबजावणी करणे असे शक्य आहे असा सवाल घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलांना यांनी उपस्थित केला. सध्या मासळीच्या विषय सोडविण्यासाठी कुणीच गंभीर नाही व काही जणांना हा विषय सुटलेला नको आहे. या विषयात आता राजकारण घुसले असा आरोप देखील त्यांनी केला.

मासळीचा विषय सुटलेला हवा होता तर एफडीएने तसेच आरोग्य खात्याने या व्यवसायाशी गुंतलेल्या लोकांकडे चर्चा केली असती. चर्चेसाठी वेळ मागून घेतला तरी तो दिला जात नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून मुख्य सचिवांकडे वेळ मागितला आहे. त्यांनी वेळ दिला व विषय समजून घेऊन तो सोडविण्यास सहकार्य केले तर ठिक आहे. अन्यथा 1 नोव्हेंबरपासून मासळीची आयात बंद केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. मासळीचा प्रश्न सोडविण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेला घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे पदाधिकारी इमाम शेख, सुदन नाईक, ज्योकीम बोर्जीस, कृष्णकुमार नाईक व शेख जहीद उपस्थित होते.

इन्सुलेटेड वाहने उलपब्ध होणे अशक्य

एफडीएने आपल्या मार्गदर्शन तत्त्वात मासळीची आयात करण्यासाठी इन्सुलेटेड वाहने वापरात आणावी, असा आदेश दिला आहे. पण, अशी वाहने उलपब्ध होणे कठीण असल्याचे मत इब्राहिम मौलांना यांनी व्यक्त केले. 300 ते 500 किलो मीटरहून मासळी आयात करण्यासाठी इन्सुलेटेड वाहनाची गरज भासत नाही. ज्या वाहनांना 12 तासांहून अधिक वेळ लागतो, अशाच वाहनांना इन्सुलेटेडची व्यवस्था असणे आवश्यक आहे. सध्या गोव्याला शेजारील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून मासळी मोठय़ा प्रमाणात आवक होत असते. त्यांना इन्सुलेटेड वाहनाची सक्ती करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. कर्नाटक व महाराष्ट्रातून आयात केली जाणारी मासळी ताजी असते असा दावा त्यांनी केला.