|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तेरेखोलवासियांच्या समस्यांवर कायदेशीर पद्धतीने निर्णय घेऊ

तेरेखोलवासियांच्या समस्यांवर कायदेशीर पद्धतीने निर्णय घेऊ 

वार्ताहर/ हरमल

मांद्रे मतदारसंघात आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने एकजुटीने तेरेखोल गावात रणशिंग फुंकले. त्यांनी कोपरा बैठकही घेतली. तत्पूर्वी केरीतील रवळनाथ मंदिर, केरी चर्च, आजोबा देवस्थान, तळकटवाडय़ावरील कुलदेवता मंदिरात जावून आशीर्वाद घेतले.

मांद्रे मतदारसंघासाठी डिसेंबर व जानेवारीत पोटनिवडणूक होऊ घातली असून तेरेखोलने पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठिशी रहावे, त्यांच्या ज्वलंत विषयाची कल्पना असून कायदेशीर पद्धतीने सर्वसमावेशक निर्णय घेऊ, असे आश्वासन प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिले.

माजी आमदार दयानंद सोपटे यांना प्रथमपासूनच विरोध आहे. परंतु त्याकाळची परिस्थिती वेगळी होती. सोपटे यांनी काँग्रेसजनांना वाईट वागणूक देत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. तोंडावर दूधाळ भाष्य, मात्र पाठिमागून वार करणाऱया या नेत्यास स्वाभीमानी मांद्रेकरांनी गद्दारी काय असते हे दाखवून द्यावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.

मांद्रेत पोटनिवडणूक लढविणारे माजी आमदार सोपटे हे एक नंबरचे खोटारडे आहेत. यापूर्वी मी भाजपकडून अडीज कोटी रुपये घेतल्याचे ते सांगत होते. हा त्यांचा ढोंगीपणा नव्हे का असा सवाल सचिन परब यांनी केला. मांद्रेवासियांनी अशा भ्रष्ट नेत्यास घरी पाठवण्याची गरज असल्याचे परब म्हणाले.

गोव्यातील भाजप सरकारने तेरेखोलवासियांवर नेहमीच अन्याय केला आहे. पूल अपूर्णावस्थेत, वीज, पाणीपुरवठा नाही, विकासकामांच्या नावाखाली सतावणूक, अशा अनेक समस्या निर्माण केलेल्या भाजपला व पर्यायाने सोपटे यांना पराभूत करण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीयमंत्री खलप यांनी व्यक्त केले.

 मांद्रेत काँग्रेससाठी योग्य वातावरण असून 4 नोव्हेंबरच्या मेळाव्यासाठी गावागावात बैठका व जागृतीचे काम हाती घेतले आहे, माजी गटाध्यक्ष तथा प्रदेश समिती सदस्य नारायण रेडकर यांनी सांगितले.

व्यासपीठावर प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा काँग्रेसचे विजय भिके, माजी मंत्री संगीता परब, प्रदेश काँग्रेसचे बाबी बागकर, इनासियो डिसोझा, तेरेखोलचे पंच कामिलो डिसोझा, आग्नेलो गुदिन्हो उपस्थित होते. बाबुसो तळकर यांनी आभार मानले.

Related posts: