|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » पाकिस्तानी संघातून मोहम्मद आमीरला डच्चू

पाकिस्तानी संघातून मोहम्मद आमीरला डच्चू 

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका आजपासून, पदार्पणवीर वकास मकसूदचे स्थान अबाधित

वृत्तसंस्था/ कराची

न्यूझीलंडविरुद्ध आजपासून खेळवल्या जाणाऱया टी-20 मालिकेसाठी अनुभवी जलद गोलंदाज मोहम्मद आमीरला पाकिस्तानने डच्चू दिला आहे. याचवेळी पदार्पणवीर वकास महमूदचे स्थान मात्र अबाधित राखले आहे. मकसूदचा यापूर्वी मागील महिन्यात न्यूझीलंड अ संघाविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीत लढलेल्या पाकिस्तान अ संघात समावेश होता. त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी वरिष्ठ संघात समावेश होता. पण, अंतिम 11 सदस्यीय संघातून खेळण्याची संधी दिली गेली नव्हती. पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेत 3 सामने होणार आहेत. त्यानंतर उभय संघ 3 वनडे व 3 कसोटी सामन्यातही आमनेसामने भिडतील. या दौऱयाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीत केले गेले आहे.

पाकिस्तानच्या संघात आमीरला दिलेला डच्चू वगळता अन्य कोणताही आश्चर्यकारक बदल नव्हता. आमीरला निवडकर्त्यांचा विश्वास संपादन करता आलेला नाही, हे यातून अधोरेखित झाले. अलीकडेच संपन्न झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत देखील त्याला संधी मिळाली नव्हती. 26 वर्षीय आमीर मागील काही महिन्यांपासून सातत्याने खराब फॉर्ममध्ये आहे. 2016 मध्ये स्पॉट फिक्ंिसगची बंदी संपल्यानंतर त्याचा संघात समावेश राहिला. पण, अलीकडे त्याचा दर्जा चांगलाच घसरल्याचे त्याच्या आकडेवारीवरुन दिसून आले आहे. अलीकडेच संपन्न झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानविरुद्ध एकही विजय संपादन करता आला नव्हता. ते कसोटी मालिकेत 0-1 तर टी-20 मालिकेत 0-3 अशा फरकाने पराभूत झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, अन्य गोलंदाजांच्या भरीव फॉर्ममुळे देखील पाकिस्तान निवड समितीला आमीरला डच्चू देण्यासाठी फारसा विचार करावा लागलेला नाही, हे ही स्पष्ट आहे.

आजपासून खेळवल्या जाणाऱया पाकिस्तान-न्यूझीलंड क्रिकेट मालिकेत दोन्ही संघांचा येथे चांगलाच कस लागेल. त्यानंतर उर्वरित दोन टी-20 सामने अनुक्रमे दि. 2 व 4 नोव्हेंबर रोजी दुबईत खेळवले जाणार आहेत.

पाकिस्तान संघ : फकहर झमन, मोहम्मद हाफीज, साहिबझादा फरहान, बाबर आझम, शोएब मलिक, असिफ अली, हुसेन तलत, सर्फराज अहमद (कर्णधार), शदाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान शनवरी, हसन अली, इमाद वासिम, वकास मकसूद, फहीम अश्रफ.

पाकिस्तान-न्यूझीलंड मालिकेची रुपरेषा

सामना / तारीख / वेळ / ठिकाण

पहिली टी-20 / 31 ऑक्टोबर / रात्री 9.30 वा. / अबुधाबी

दुसरी टी-20 / 2 नोव्हेंबर / रात्री 9.30 वा. / अबुधाबी

तिसरी टी-20 / 4 नोव्हेंबर / रात्री 9.30 वा. / दुबई

पहिली वनडे / 7 नोव्हेंबर / सायं. 4.30 वा. / अबुधाबी

दुसरी वनडे / 9 नोव्हेंबर / सायं. 4.30 वा. / अबुधाबी

तिसरी वनडे / 11 नोव्हेंबर / सायं. 4.30 वा. / दुबई

पहिली कसोटी / 16 ते 20 नोव्हें. / सकाळी 11.30 वा. /अबुधाबी

दुसरी कसोटी / 24 ते 28 नोव्हें. / सकाळी 11.30 वा. / दुबई

तिसरी कसोटी / 3 ते 7 डिसें./ सकाळी 11.30 वा. / अबुधाबी