|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » काळय़ादिनाच्या फेरीत मोठय़ा संख्येने सहभागी व्हा

काळय़ादिनाच्या फेरीत मोठय़ा संख्येने सहभागी व्हा 

प्रतिनिधी/ बेळगाव

 सीमालढय़ाला बळकटी देण्यासाठी गुरुवार दि. 1 नोव्हेंबर रोजी म्हणजेच काळय़ादिनी निघणाऱया सायकल फेरीत मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार सीमावासियांनी व्यक्त केला आहे. काळय़ादिनी सीमावासीयांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेते मंडळींना आणण्याचे प्रयत्न समिती नेत्यांनी सुरू केले आहेत. अद्याप फेरीला परवानगी मिळालेली नसून पोलिसांनी अटींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत सशर्त परवानगी मिळण्याची शक्मयता आहे. 

सीमावासियांवर करण्यात आलेल्या अन्यायाच्या विरोधात 1956 पासून दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी हरताळ व मूक सायकल फेरी काढण्यात येते. अनेक वर्षांपासून केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाविरोधात हा लढा सुरू आहे. त्यामुळे काळय़ा दिनी सीमावासियांनी आपापले व्यवहार बंद ठेवून मोर्चामध्ये सहभागी होवून महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार पुन्हा एकदा दाखवून देण्याची गरज आहे. म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांनी पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांच्याकडे सायकलफेरीसाठी  परवानगीची मागणी केली होती. त्यानुसार राजप्पा यांनी मंगळवारी सायकलफेरीच्या मार्गाची पाहणी केली आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याशी विशेष बैठकही झाली असून मार्गासंदर्भात चर्चा झाली आहे.

काळय़ादिनी काळे कपडे व दंडावर काळय़ा फिती बांधून सहभागी होण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले असून युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘लढा नाही तर गुलामगिरीची सवय होईल’ असा मजकूर लिहिलेल्या टी शर्टच्या माध्यमातून जागृती सुरू केली आहे. यावेळी तरुणांचा उत्साह अधिक आहे. तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती सुरू केल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी संपर्क

काळय़ादिनाला महाराष्ट्रातील नेते मंडळी उपस्थित राहण्याची शक्मयता आहे. या संदर्भातील नावे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी समिती नेते व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी याबाबत संपर्क साधला आहे. मागीलवेळी महाराष्ट्रातील नेते मंडळींवर सीमाभागात बंदी लादण्याचा प्रकार बेळगाव प्रशासनाने केला होता. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. स्वाभीमानी पक्षाचे नितेश राणे यांनी उपस्थिती दाखवून सीमावासियांचा उत्साह वाढविला होता.

महाराष्ट्र एकीकरण समितीने धर्मवीर संभाजी चौकातून मूकफेरीच्या मार्गाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली असली तरी प्रशासनाने मागील वषीप्रमाणेच सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी उद्यान येथून फेरी काढण्यात यावी, अशी सूचना केली आहे. दरम्यान बेळगावातील तरुण, नागरिक, महिला या फेरीत मोठय़ा संख्येने सहभागी होऊन आपली इच्छा प्रकट करत असताना काही समाज कंटकांकडून फेरीमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होण्याची शक्मयता आहे, असे आढळल्यास समिती नेत्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन

फेरीचा मार्ग निश्चित झालेला असल्याने त्या मार्गावर अडथळा होणार नाही, यासाठी समिती पदाधिकाऱयांबरोबरच प्रत्येकांनी प्रयत्न करावेत. मार्गावरुन फेरी जात असताना झेंडे उंचावून फिरविताना रस्त्यावर असलेल्या पताका तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी, सर्व मराठी जनतेने आपापले व्यवहार बंद ठेवून फेरीत व त्यानंतर होणाऱया सभेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

खासगी वाहनांची अडवणूक सुरू

कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्ताने जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने खासगी वाहनांची अडवणूक करण्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. एपीएमसीत कांदे, बटाटा घेवून ये-जा करणाऱया ट्रक्टर व इतर वाहनांनाही राज्योत्सवात सहभागी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.