|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » ‘देआसरा’ने दिले छोटय़ा उद्योजकांना प्रोत्साहन

‘देआसरा’ने दिले छोटय़ा उद्योजकांना प्रोत्साहन 

ऑनलाईन टीम / पुणे :

ना नफा तत्वावर काम करणाऱया ‘देआसरा फाउंडेशन’ने देवांग मेहता ऑडिटोरियम, पुणे येथे उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार आयोजित केला. पुरस्कार सोहळय़ाच्या माध्यमातून देआसराने उद्योजकांचा यशस्वी प्रवास व त्यांचे अनुभव लोकांसमोर मांडले ज्यामुळे अनेक व्यावसायिकांना प्रेरणा मिळाली. या सोहळय़ात

मिलिंद शालगर, शालगर होजिअरी, नेहा लागू, संचालक, लागू बंधू ज्वेलर्स, डॉ. विनय कोपरकर, संस्थापक, संचालक, पॅपिलॉन हेअर व फेस क्लिनिक, मंदार देसाई, देसाईबंधू आंबेवाले, हनमंत गायकवाड, संस्थापक, संचालक बीव्हीजी ग्रुप या यशस्वी उद्योजकांना डॉ. आनंद देशपांडे, संस्थापक, संचालक पर्सिस्टंट सिस्टिम्स लि. व संस्थापक देआसरा फाउंडेशन यांच्याहस्ते उत्कृष्ट उद्योजकाचा पुरस्कार देण्यात आला. या यशस्वी उद्योजकांनी त्यांचा व्यावसायिक प्रवास गप्पांच्या स्वरूपात सगळय़ांसमोर मांडला. याशिवाय त्यांना या प्रवासात आलेल्या अडचणी व त्यांनी त्यावर कशी मात केली हेही सांगितले. यामुळे सगळय़ा उपस्थितांना नक्कीच प्रोत्साहन मिळाले. या पुरस्कार सोहळय़ात प्रस्थापित उद्योजकांचे कौतुक तर झालेच याशिवाय देआसराने मार्गदर्शन केलेल्या व्यावसायिकांनाही वेगवेगळय़ा उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल या पुरस्कृत उद्योजकांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. देआसराने आजपर्यंत 8000 हून अधिक व्यावसायिकांना मार्गदर्शन केले आहेजे फूड, फॅशन, ब्युटी या व अशा अनेक क्षेत्रातील आहेत.

डॉ.आनंद देशपांडे म्हणाले, ‘देआसरा शहरातील रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. उद्योजकांना सर्व व्यावसायिक माहिती व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे यासाठी देआसरा कार्यरत आहे.’ उद्योजकांना प्रोत्साहन देताना हनमंत गायकवाड म्हणाले, ‘स्वतःचा व्यवसाय सुरु करत असताना देशाच्याप्रगतीसाठीही काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा होती. सातत्याने आपल्या ध्येयासाठी प्रत्येक उद्योजक जर काम करत राहिला तर यशस्वी उद्योगाचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.’

शालगर म्हणाले, ‘उत्पादनातील वेगळेपण तुमच्या व्यवसायासाठी नक्कीच फायदेशीर ठरते. शालगर होजिअरी गेले अनेक वर्षे वेगवेगळय़ा पारंपारिक कपड्यांद्वारे उत्पादनात वेगळेपण आणत आले आहेत आणि आज संपूर्ण कुटुंबासाठी कपडे मिळण्याचे ठिकाण म्हणून नावाजले आहेत.’ साचेबद्ध काम न करता खास पुरुषांसाठी हेअर डेसिंग सलून व स्किन ट्रीटमेंट सेंटर काढणारे विनय कोपरकर हे पहिलेच डॉक्टर होते. अर्थातच नकारात्मक प्रतिक्रिया आणि टीका लोकांनी केल्याचे. पण त्याला दाद न देता या विषयाबद्दल त्यांनी अधिकाधिक अभ्यास करून शिक्षण घेतले व केस कापणे म्हणजे नुसती हजामत नाही तर ते एक शास्त्र आहे अशी विचारसरणी त्यांनी आणली. ‘गेले 87 वर्षे देसाई बंधू आंबेवाले ग्राहकांचा विश्वास जपत आले आहेत आणि तीच उद्योजक म्हणून यशाची एक गुरुकिल्ली आहे’, असे मंदार देसाई म्हणाले.

‘आजच्या ग्राहक वर्गाच्या आवडी निवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रत्येक दागिना तयार करणे यावर लागू बंधू ज्वेलर्सचा भर असतो.’, असे नेहा लागू त्यांचा अनुभव सांगताना म्हणाल्या.

Related posts: