|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणातील सर्व कॉम्प्लेक्स चौकशीच्या फेऱयात

मालवणातील सर्व कॉम्प्लेक्स चौकशीच्या फेऱयात 

तपासणीचे नगराध्यक्षांचे आदेश : बांधकाम विभागावरून नगराध्यक्ष-मुख्याधिकाऱयांत वाद

कॉम्प्लेक्सची चौकशी शहर बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम – उपनगराध्यक्ष

परवानगी, भोगाधिकार प्रमाणपत्र फिल्टरेशन प्लान्टची चौकशी होणार

प्रतिनिधी / मालवण:

शहरातील रस्ते बदलून बिल्डरांच्या कॉम्प्लेक्सला परवानगी दिली जातेय. तीन मजल्यांची परवानगी असताना, चार मजल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. पालिकेच्या जागेतून बिल्डरांना रस्ते बनवून दिले जाताहेत. अग्नीशामक बंब फिरू शकत नाही, अशा ठिकाणी कॉम्प्लेक्स उभी राहिली आहेत. सर्वसामान्यांची फसवणूक होत असताना पालिका प्रशासनाकडून शहर बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम होत आहे, असा गंभीर आरोप करीत यात गुंतलेल्या सर्वांची चौकशी होण्यासाठी सर्व कॉम्प्लेक्सची चौकशी करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजन वराडकर व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी बुधवारी केली.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत महिन्यात शहरातील सर्व कॉम्प्लेक्सच्या परवानगी, भोगाधिकार प्रमाणपत्र, फिल्टरेशन प्लान्ट आदी बाबींची तपासणी करून चौकशी अहवाल सभागृहात सादर करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. बांधकाम विभागाच्या कामकाजाच्या विषयावर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यातही शाब्दिक वाद झाला. मालवण नगरपालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे आदी अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालिकेच्या दिवंगत कर्मचाऱयांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अनधिकृत शेरा हटणार कधी – वराडकर

सर्वसामान्यांना अन्यायकारक ठरत असलेल्या घरपत्रकावरील अनधिकृत शेरा हटविण्याबाबत अनेक सभांमध्ये चर्चा होऊन मागणी करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने वराडकर यांनी नाराजी व्यक्त केली. यावर आचरेकर व मंदार केणी यांनीही पालिका प्रशासन कोणत्या आदेशाची वाट पाहतेय. सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणारी कार्यवाही करताना पालिका प्रशासनाने सभागृहाची मान्यता घेतलेली नाही आणि आता सभागृहाची सूचना असूनही शेरा हटविण्याची कार्यवाही केली जात नाही, याबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली. यावर पुढील सभेसमोर माहिती ठेवण्याचे आदेश नगराध्यक्षांनी कर विभागाला दिले.

नगराध्यक्षांनी जनतेचा विश्वास गमावला!

सुदेश आचरेकर यांनी नगरसेविका सुनीता जाधव आणि महिला बालविकास सभापती तृप्ती मयेकर यांनी नगराध्यक्षांकडे विनंती करूनही त्यांना सभा सुरू होण्यापूर्वी सभागृहात बोलण्याची परवानगी नाकारल्याने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. नगराध्यक्षांनी जनता आणि सहकारी नगरसेवकांचाही विश्वास गमावला आहे. आम्ही एकाधिकारशाही खपवून घेणार नाही. नगरसेवकांना सभागृहात बोलण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही, असा इशारा दिला. नगराध्यक्षांनी आपण आयत्या वेळच्या विषयात सर्वांना बोलण्याची संधी देणार होतो. सभागृहात बोलण्यापासून आपण कधीच कोणाला रोखत नाही, असे सांगितले.

हायमास्ट जागा बदलण्याच्या विषयावर वाद

आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी एक हायमास्ट एसटी स्टँड परिसरात बसविण्याची सूचना केली. त्यावर नगराध्यक्ष कक्षात निर्णय घेण्याच्या तोडग्यावर विषय स्थगित ठेवण्यात आला. सत्ताधाऱयांकडून या विषयाचा ठराव घेण्याची सूचना होत असतानाही नगराध्यक्षांनी ठराव घेण्याचे टाळले. ममता वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, दीपक पाटकर, राजन वराडकर, सुदेश आचरेकर यांनी मते मांडली.

नगरपालिका कर्मचाऱयांना दीपावली भेट

स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नगरपालिकेला मिळालेल्या पाच कोटी रुपयांच्या बक्षिसातून पालिकेच्या स्थायी व अस्थायी कर्मचाऱयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दीपावली भेट म्हणून सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. याचा फायदा पालिकेतील 42 कर्मचाऱयांना होणार आहे.

पूजा करलकरöमुख्याधिकारी यांच्यात वाद

नगरसेविका पूजा करलकर यांनी शहरात अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत कोणती कार्यवाही झाली, यावर मुख्याधिकारी यांच्याकडे दाद मागितली. यावर मुख्याधिकारी यांनी सुधाकर पाटकर यांच्याकडे चार्ज देण्यात आल्याचे सांगितले. पाटकर यांनी आपली प्रकृती ठिक नाही व अनेक चार्ज आपल्याकडे असल्याने हे काम करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर करलकर यांनी पुन्हा मुख्याधिकाऱयांकडे दाद मागितली असता, त्यांनी शासनाकडून कर्मचारी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करा. कमी कर्मचारी घेऊन आम्ही काम करतो. त्यामुळेच पाच कोटींचे बक्षीस मिळाल्याचे सांगितले. करलकर यांनी कर्मचारी नसेल, तर कंत्राटी घ्या, आम्हाला कारणे नको, असे सुनावले. 

नगरसेविका झाल्या भावविवश

तृप्ती मयेकर यांनी त्यामुळे नाराज होऊन सभागृह सोडले. काही वेळाने त्या पुन्हा सभागृहात येऊन आपल्या भावना व्यक्त करताना भावविवश झाल्या. माझ्या घरातील एक व्यक्ती रुग्णालयात आहे, दुसरी व्यक्ती अत्यवस्थ आहे, अशा परिस्थितीत मला सभेला येण्यासाठी जबरदस्ती केली गेली तसेच सभेला न आल्यास सदस्यत्व रद्द करण्याची धमकी दिली, असे त्या म्हणाल्या. उपनगराध्यक्ष  वराडकर यांनी यावर नगराध्यक्षांच्या कक्षात चर्चा करण्यात येईल, असे सांगत विषयावर पडदा टाकला. नगरसेविका ममता वराडकर यांनीही आपल्या प्रभागात मंजूर असलेला हायमास्ट अन्यत्र नेण्याचा डाव खेळला जात आहे. प्रत्येकवेळी माझ्याच प्रभागावर अन्याय का? असे सांगत त्याही भावविवश झाल्या.