|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अबकारी करखाते, बेकायदा दारुविक्रेत्यांचे लागेबांधे शिवसेनेमुळे उघड

अबकारी करखाते, बेकायदा दारुविक्रेत्यांचे लागेबांधे शिवसेनेमुळे उघड 

प्रतिनिधी /पणजी :

संरक्षित भागांमध्ये विशेषतः अभयारण्यांमध्ये चोरुन दारू विक्रेते आणि अबकारी करअधिकारी यांच्यात असणारे लागेबांधे उघड करण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. नेत्रावळी अभयारण्यात बेकायदा दारुचे दुकान चालविणाऱया आशा गावस यांचा उत्पादन परवाना अबकारी खात्याचे आयुक्त अमित सतीजा यांनी रद्द केला असल्याची माहिती गोवा शिवसेनेच्या प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत गोवा शिवसेनेचे उपाध्यक्ष मायकल कारास्को यांची उपस्थिती होती. वन्यजीवांचा भाग हा अशाप्रकारच्या व्यवसायासाठी उपयोग करु न देण्याचे ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’द्वारे अनिवार्य करण्यात आले आहे. या भागात व्यवसाय करण्यासाठी अबकारी करखात्याने दि. 30 ऑगस्ट 2017 रोजी परवाना दिला होता. त्यासाठी स्थानिक नेतुर्ली ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखलाही घेण्यात आलेला नव्हता. शिवसेनेने माहिती हक्क कायद्याच्या अधिकाराखाली अनेक अर्ज करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. परवानाधारकांसाठी अबकारी करखात्याच्या अधिकाऱयांनी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता न करण्याची मुभाही दिली होती असे आरोप नाईक यांनी केले.

या प्रकरणी अबकारी करखात्याचे सहाय्यक आयुक्त सत्यवान भिवशेट, सांगे येथील अबकारी करखात्याचे निरीक्षक प्रशांत पैंगणकर आणि अर्जावर प्रक्रिया करणारे सगळे संबंधित अधिकाऱयाविरुद्ध शिवसेना दक्षता संचालकांकडे औपचारिक तक्रार दाखल करणार आहे असेही त्या म्हणाल्या.

नाईक यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यभरातील अभयारण्ये व संरक्षित भागांमध्ये अधिकाऱयांचे संबंध पसरले आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा आणि राज्य अबकारी करकायदा यांचे उल्लंघन करून बेकायदा सुरु करण्यात आलेली चोरटय़ा दारुची दुकाने शिवसेना स्वतःची पथके स्थापन करून स्थानिकांच्या मदतीने शोधून काढणार आहे. वन्यजीवांचा वावर असणारे भाग व निसर्ग यांना संरक्षण देण्याला शिवसेना नेहमीच अग्रणी असेल. बेकायदा दारुदुकाने व लागेबांधे यांच्याविरुद्धची मोहीम राज्यभर चालूच राहील. लोकांनीही पुढे येऊन असले प्रकार आमच्या नजरेस आणून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.