|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुटुंबाचे आयुष्य घडवणारा टॅक्सी पायलट सुरक्षीत राहायलाच हवा- महादेव आरोंदेकर

कुटुंबाचे आयुष्य घडवणारा टॅक्सी पायलट सुरक्षीत राहायलाच हवा- महादेव आरोंदेकर 

प्रतिनिधी/ वास्को

मोटरसायकल टॅक्सी पायलट हा गोव्यातील जुना आणि अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक असा व्यवसायीक घटक आहे. त्यांच्या सुरक्षेचा सखोल विचार करणारी लोकमान्य बहुउद्धेशीय संस्था कदाचीत एकमेव असावी. रस्तोरस्ती फिरून आपल्या कुटुंबाचे आयुष्य घडवणारा हा घटक सुरक्षीत राहीला तरच त्याचे कुटुंब सुरक्षीत राहील असे प्रतिपादन मुरगावचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांनी केले.  आपल्या परीवारावरील संकट टाळण्यासाठी मोटरसायकल टॅक्सी पायलटांनी हेल्मेट सक्तीने वापरावे व समाजातील इतर घटकांकडेही सुरक्षीततेचा संदेश पोहोचवावा असे आवाहनही त्यांनी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या हेल्मेट वितरण कार्यक्रमात केले.

लोकमान्य संस्थेतर्फे पणजी आणि मडगावमध्ये पायलटांना हेल्मेट वितरीत करण्यात आल्यानंतर वास्कोतील रवींद्र भवनमध्ये या संस्थेतर्फे मोटरसायकल टॅक्सी पायलटांना हेल्मेट वितरण करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरगावचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगावचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर तर सन्माननीय अतिथी म्हणून सहाय्यक वाहतुक संचालक विनोद आर्लेकर उपस्थित होते. व्यासपीठावर लोकमान्यचे विभागीय व्यवस्थापक सुहास खांडेपारकर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्लवन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वास्कोतील एकूण 55 मोटरसायकल टॅक्सी पायलटांना उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते हेल्मेट वितरीत करण्यात आली.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे महादेव आरोंदेकर यांनी आज गोव्यात आणि देशात अनेक सहकारी वित्तीय संस्था आहेत. मात्र, मोटरसायकल टॅक्सी पायलट अशा समाजातील एका कमकुवत घटकाच्या सुरक्षेकडे कुणी गांभीर्याने पाहिले नव्हते. त्यामुळे लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था कौतुकास पात्र असून त्यांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. रस्त्यावरील असुरक्षीततेचा धोका या संस्थेने ओखळला. या उपक्रमाचा योग्य लाभ मोटरसायकल टॅक्सी पायलटांनी घ्यावा. संस्थेच्या चांगल्या विचारांचा आदर करावा असे ते म्हणाले. वाहतुकीत हेल्मेट न वापरणे किती धोकादायक असते याची कल्पना जे अपघातात सापडलेले आहेत त्यांनाच अधिक असते. परंतु ही पाळी आपल्यावर येऊ देऊ नका. आपण कितीही सुरक्षीतरीत्या वाहन चालवीत असलो तरी समोरून येणारा वाहन चालक कसा असेल याची कल्पना आपल्याला नसते. त्यामुळेच आपण सावध असायला हवे. देशातील तीस टक्के अपघात हे गोव्यातच घडत असतात. या अपघातातून वाचण्यासाठी हेल्मेट हे एक सुरक्षीततेचा साधन आहे. मोटरसायकल टॅक्सी पायलट व्यवसाय हा केवळ गोव्यातच असून जुना आणि तितकाच प्रामाणिक व विश्वासू घटकाचा हा व्यवसाय आहे. असुरक्षीत असलेला हा घटक रस्तोरस्ती फिरून आपल्या कुटुंबाचे आयुष्य घडवत असते. परीवाराची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच असते. त्यामुळे पायलट सुरक्षीत राहणे म्हणजेच त्यांचे कुटुंब सुरक्षीत राहणे होय. पायलटांनी हेलमेट परीधान करून स्वत: सुरक्षीत राहावे आणि इतरांमध्येही सुरक्षेचा संदेश पोहोचवावा असे उपजिल्हाधिकारी आरोंदेकर म्हणाले.

लोकमान्य संस्थेचा उत्कृष्ठ सामाजीक उपक्रम

मुरगावचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांनी यावेळी बोलताना लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी संस्था विविध स्तरावर समाजकार्य करीत असल्याचे सांगून पायलटांच्या सुरक्षेसाठी आणि रस्त्यावरील सुरक्षेचा संदेश पोहोचवण्यासाठी व जागृती करण्यासाठी हाती घेतलेला हेल्मेट वितरणाचा उपक्रमही उत्कृष्ठ असा उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. ही संस्था मनापासून समाज कार्य करीत आहे. अशाच प्रकारे इतर उद्योग व्यवसायीकांनीही समाजाच्या भल्यासाठी समोर यायला हवे. वास्कोतील उद्योजकांनी समाजाच्या हिताचे उद्धीष्ठ ठेवल्यास वास्को परीसराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही असे नगराध्यक्ष गावकर म्हणाले.

प्रत्येक चालकाने रस्त्यावरील धोका ओळखायला हवा

रस्ता अपघातांची समस्या ही केवळ गोव्यातील आणि देशातील नाही. ही समस्या जगभर आहे. प्रत्येक देश ही समस्या हलकी करण्यासाठी आपापल्यापरीने विविध मार्गाने प्रयत्न करीत आहेत. कायदे करीत आहेत. अभ्यासासाठी समित्या स्थापन होत आहेत. अपघात कमी होतील अशा पद्धतीच्या वाहनांची निर्मितीही करण्यात येते. मात्र, अपघातांची चिंता सर्वानाच आहे. या पाश्वभूमीवर लोकमान्य संस्थेने चालकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वितरणाचा घेतलेला निर्णय कौतुकास पात्र आहे असे साहाय्यक वाहतुक संचालक विनोद आर्लेकर म्हणाले. मोटरसायकल टॅक्सी पायलट व्यवसाय हा पोर्तुगीजकाळापासून चालत आलेला एक प्रामाणिक व्यवसाय आहे. दुर्लक्षीत अशा मोटरसायकल पायलटांकडे संस्थेने लक्ष केंद्रीत केले हेसुद्धा वाखाणण्यासारखेच आहे. दिल्ली पाठोपाठ गोवा हा देशात अपघातांमध्ये दुसऱया क्रमांकावर आहे. त्यात सर्वांधिक अपघात आणि मृत्यू हे मानवी चुकांमुळेच घडतात. रोज कुणा ना कुणाचा मृत्यू होत असतो. रोज कुणी ना कुणी अपंग होत असतो. अपघातांमध्ये दुचाकींचा भरणा साठ टक्के असतो. आपण हा धोका ओळखायला हवा. आणि सुरक्षेचा विचार प्रत्येकाने करायला हवा असे विनोद आर्लेकर म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य संस्थेचे विक्री व्यवस्थापक इम्यान्युयल फुर्तादो यांनी लोकमान्य सहकारी संस्था आणि हेल्मेट वितरणाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. सहाय्यक विभागीय व्यवस्थापक गोविंद धुरी यांनी लोकमान्य सहकारी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. कार्यकमाच्या अखेरीस मनोगत व्यक्त करताना मुरगाव मोटरसायकल टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बाबू आसोलकर यांनी लोकमान्य संस्थेचे आभार व्यक्त केले. लोकमान्यच्या नवेवाडे शाखेच्या व्यवस्थापक मनिषा साळगावकर यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला लोकमान्य संसथेचे समन्वयक पास्कॉल डिकॉस्ता, दाबोळी शाखेचे व्यवस्थापक सुदन रेडकर, बायणा शाखेच्या व्यवस्थापक स्वाती वायंगणकर, सडा शाखेच्या व्यवस्थापक प्ंिाखतम पेडणेकर, वास्को शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक वासू आमोणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर बायणा रवींद्र भवन ते वास्को शहर अशी रॅली मोटरसायकल टॅक्सी पायलटांकडून काढण्यात आली.

Related posts: