|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » अवघ्या सहा महिन्यातच जन्माला आलेल्या लहान बाळाला मिळाले जीवनदान ; ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये सुरु होता संघर्ष

अवघ्या सहा महिन्यातच जन्माला आलेल्या लहान बाळाला मिळाले जीवनदान ; ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये सुरु होता संघर्ष 

ऑनलाईन टीम / पुणे :

गर्भधारणेच्या अवघ्या 25 आठवड्यानंतर फक्त 550 ग्रॅम वजन असलेल्या लहान बाळाचा जन्म झाला परंतु ही केस अतिशय गुंतागुंतीची होती. कारण या बाळाचा जन्म नियोजित वेळेपूर्वी खूप आधी झालेला असल्यामुळे बाळाचे वजन खूप कमी होते. एका 46 वर्षांच्या महिलेने आयव्हीएफच्या माध्यमातून दोन जुळय़ा मुलांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. दुर्दैवाने यातील एक मुल जिवंत राहू शकले नाही आणि दुसऱया बाळाला  श्वासोस्वास करण्यास त्रास होत असल्याने त्याला यंत्रणेद्वारे कृत्रिम श्वासोस्वास दिला जात होता.

या बाळाला ‘रेस्पिरेटरी डीस्ट्रेस सिंड्रोम’ झाल्याने श्वास घेण्यात अडथळे येत होते. या बाळाला इन्क्युबेटर मध्ये ठेवून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. तसेच त्याला सलग 11 दिवस लाइफ सपोर्ट देण्यात आला आणि सीपीएपी नावाची दुसरी श्वसनाची कृत्रिम यंत्रणा पुढील एक महिन्यासाठी त्याला लावण्यात आली. बाळाला पुरेशी पोषण द्रव्ये देता यावीत आणि त्याचा रक्तदाब वेळोवेळी पाहता यावा म्हणून या बाळाच्या नाळेसाठी विशेष कैथेटर तयार करण्यात आले. 0.5 मिलीच्या टय़ूबमधून आईचे दुध बाळाला सुरु करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही कालावधीनंतर पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीत दुधाचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवण्यात आले. अद्ययावत अशी साधने, प्रशिक्षित वैद्यकीय आणि नर्सिंग कर्मचारी वर्ग असल्याने बाळाला व्हेंटीलेटर संबंधित गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या नाहीत. उपचार करीत असताना बाळाला अतिशय गंभीर स्वरूपाचा असा जंतुसंसर्ग झाला आणि मग निओनेटल इंटेन्सीव्ह केअर युनिट (एनआयसीयू) मध्ये पूर्ण वेळ डॉक्टरांच्या टीमने त्या बाळाची तत्परतेने काळजी घेतली. कोणतीही आणखी गंभीर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. अशक्तपणामुळे त्या बाळाच्याही रक्ताचे रुपांतर करणे गरजेचे झाले होते. ‘अवघ्या 25 व्या आठवड्यात जन्माला आलेल्या बाळाची काळजी घेणे आमच्या वैद्यकीय आणि नर्सिंग अशा सर्वांसाठीच मोठे आव्हान होते. खूप आधी जन्माला आलेल्या अशा बाळांचे फुफ्फुस, आतडे, मेंदू, त्वचा आदींचा पुरेसा विकास झालेला नसतो. त्यामुळे पुरेशा विकसित न झालेल्या अवयवांमुळे आणि संसर्गामुळे बहुतांश वेळेला गुंतागुंतीची स्थिती निर्माण होत असते. परंतु विशेषत्वाने तयार केलेला वैद्यकीय आणि नर्सिंग स्टाफ, अद्ययावत साधने आणि पालकांनी दिलेले सहकार्य यामुळे आम्ही बाळाला कोणत्याही गुंतागुंतीशिवाय सुखरूप बाहेर काढू शकलो आणि बाळाचा जीव वाचवू शकलो.’, असे मत पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे निओनेटालॉजिस्ट आणि पेडीयाट्रिक इंटेसीव्हीस्ट कन्सल्टंट डॉ.श्रीनिवास तांबे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना ज्युपिटर हॉस्पिटलचे पेडीयाट्रिशियन डॉ. सचिन आडमुठे म्हणाले की, ‘अशा परिस्थितीतील मुलांमध्ये आणखी एक आव्हान दिसते ते म्हणजे, त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव होतो, गुंतागुंतीचे फुफ्फुसाचे आजार होतात आणि खूप आधी जन्म झाल्याने दृष्टीवरही त्याचा परिणाम होतो. परंतु शरीरात योग्य प्रमाणात हवा आत बाहेर जाण्याची केलेली व्यवस्था, योग्य प्रमाणात दिलेले ऑक्सजिन यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होण्यास आम्हाला प्रतिबंध करण्यात आला. 25 आठवडय़ात जन्माला आलेल्या बाळामध्ये अशी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ न देता जगवणे ही अतिशय दुर्मिळ अशी बाब आहे. तब्बल 99 दिवसांच्या अथक प्रयत्न आणि संघर्षानंतर या बाळाला 100 व्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यावेळी बाळाचे वजन 1.670 किलो होते. या बाळाची वाढ आणि विकास यावर यानंतरही काळजीपूर्वक लक्ष दिले जाणार आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये 700 ग्रॅमहून कमी वजन असलेल्या आणि खूप आधी जन्माला आलेल्या तीन बाळांना यशस्वीरीतीने उपचार देऊन घरी पाठवण्यात आले आहे. ‘माझ्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरानी आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाने जी तत्परता आणि आत्मीयता दाखवली आहे त्या साऱ्यांची मी कायमची ऋणी आहे.’ असे मत अत्यंत भावनिक झालेल्या आईने व्यक्त केले.

Related posts: