|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » …अन्यथा वेळ निघून जाईल!

…अन्यथा वेळ निघून जाईल! 

उग्रवादाबद्दल सैन्यप्रमुखांचा इशारा : पंजाबला अशांत करण्याचा कट, आसाममध्ये देखील धोका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

समृद्ध पंजाबला अशांत करण्याचा रचल्या जाणाऱया कटांबद्दल सैन्यप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सतर्क केले आहे. देशाबाहेरील घटकांद्वारे पंजाबमध्ये उग्रवादाचे भूत पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न होतोय. वेळीच कारवाई करण्यात न आल्यास खूप विलंब होईल, असे रावत यांनी शनिवारी म्हटले आहे.

 भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या बदलत्या स्थितीवर आधारित चर्चासत्रात रावत यांने वरिष्ठ सैन्याधिकारी, संरक्षण तज्ञ, माजी शासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱयांना संबोधित केले. बाहेरील घटक आणि चिथावणीच्या माध्यमातून आसाममध्ये देखील उग्रवाद पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न होत असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

आम्हाला दक्ष रहावे लागेल

पंजाब शांतिपूर्ण राहिला आहे, परंतु बाहेरील घटकांकडून राज्यात पुन्हा उग्रवाद सुरू करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. आम्हाला याप्रकरणी दक्ष रहावे लागेल. स्थिती ठीक आहे असा विचार घातक ठरू शकतो. पंजाबमध्ये जे काही घडतंय, त्याबद्दल आम्ही डोळे बंद करून शांत बसू शकत नाही. वेळीच कारवाई न झाल्यास खूप उशीर होईल, असे त्यांनी म्हटले. खलिस्तान समर्थक चळवळीच्या काळात 1980 च्या दशकात पंजाबने उग्रवादाचा मार झेलला आहे. या उग्रवादाला नियंत्रणात आणण्यास सरकारला यश आले असले तरीही हजारो जणांना स्वतःचा जीव गमवावा लागला होता.

लंडन रॅलीचा उल्लेख

चर्चासत्रात उत्तरप्रदेशचे माजी पोलीस महासंचालक प्रकाश सिंग यांनी देखील याप्रकरणी जोर दिला आहे. पंजाबमध्ये उग्रवादाचे भूत पुन्हा उभे करण्याचे प्रयत्न चालले आहेत. लंडनमध्ये काढण्यात आलेल्या खलिस्तान समर्थक रॅलीत ‘जनमत संग्रह 2020’ची मागणी करण्यात आली होती. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या या खलिस्तान समर्थक रॅलीत शेकडो जण सहभागी झाले होते, असे प्रकाश सिंग यांनी म्हटले आहे.

उग्रवाद कसा रोखणार?

केवळ सैन्याच्या माध्यमातून उग्रवाद रोखला जाऊ शकत नाही. सर्व यंत्रणा, सरकार, नागरी प्रशासन, सैन्य आणि पोलिसांनी मिळून एक दृष्टीकोनावर काम केल्यास यावर मात करता येणार असल्याचे रावत यांनी जोर देत सांगितले आहे.

विदेशातील कारवाया

लंडन येथील रॅलीचा उद्देश 2020 मध्ये अनिवार्य नसलेल्या जनमत चाचणीसाठी जागरुकता निर्माण करणे असल्याचा दावा शिख फॉर जस्टिसने (एसएफजे) केला आहे. पंजाबला कथित स्वातंत्र्य दिलो जावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. परंतु खलिस्तानपूरक या रॅलीच्या विरोधात भारतीय समुदायाकडून ‘आम्ही देखील भारतासोबत’ आणि ‘लव्ह माय इंडिया’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अंतर्गत सुरक्षा मोठी समस्या

अंतर्गत सुरक्षा देशाच्या सर्वात मोठय़ा समस्यांपैकी एक आहे, परंतु आम्ही यावर उत्तर का शोधू शकत नाही हा प्रश्न निर्माण उपस्थित होतो, या समस्येत बाहेरील घटकांचा हातभार असल्याने यावर अत्यंत विचारपूर्वक पावले टाकावी लागतील, असे रावत म्हणाले. या चर्चासत्राचे आयोजन डिफेन्स थिंकटँक ‘क्लाऊज’ने (सेंटर फॉर लँड अँड वॉरफेयर स्टडीज) केले होते. या थिंकटँकमध्ये रावत यांचाही सक्रीय सहभाग आहे.

Related posts: