|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा राज्य छोटेच, पण मवाळ नव्हे!

गोवा राज्य छोटेच, पण मवाळ नव्हे! 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा हे छोटे राज्य जरुर आहे, पण मवाळ राज्य नाही. गोव्यातील जनतेचे हित जपणे आणि जनतेला दर्जेदार वस्तू पुरविणे ही गोवा सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कुणीतरी धमकावले म्हणून गोवा सरकार दबणार नाही. गोव्यात मासळी व्यवसाय करायचा असेल तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावेच लागेल, असा इशारा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गोव्याचा आणि सिंधुदुर्गचा दर्जा समान नव्हे. गोव्यातील लोकांचा दर्जा मोठा आहे. सिंधुदुर्गातील मासळी गोव्यात आणावयाची असेल तर मार्गदर्शक तत्वांचे आणि नियमांचे पालन करावेच लागेल. गोव्यात फॉर्मेलिनचा विषय उफाळून आल्यानंतरच अन्न आणि औषध प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागली. एफडीएचे मंत्री विश्वजित राणे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

बाहेरुन येणाऱया मासळीवर बंदी नाही

गोव्याबाहेरून येणाऱया मासळीवर सरकारने बंदी घातलेली नाही, मात्र फॉर्मेलिनचा मुद्दा समोर आल्यामुळे आणि गोवेकरांना ताजी तसेच रसायनमुक्त मासळी मिळावी, यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. ज्यांना गोव्यात मासळीचा व्यवसाय करायचा असेल त्यांना मार्गदर्शक तत्वांचे पालन करावेच लागेल. मासळी व्यवसायातील माफियांना आम्ही पाठिंबा देणार नाही. त्याचबरोबर कुणीतरी दबावाचे राजकारण सुरू केले म्हणून गोवा सरकार आपल्या निर्णयापासून मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले.

कॅसिनो बाहेर काढण्याची मागणी काँग्रेसचीच

मांडवीतून कॅसिनो बाहेर काढावेत ही मागणी काँग्रेसचीच होती. आज काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड वाट्टेल ते बोलतात. माकाव, ला वेगास प्रमाणे कॅसिनो एकाच जागी असावे यासाठी निर्णय घेणे योग्यच आहे, मात्र अद्याप सरकारने निर्णय घेतलेला नाही आणि गोव्यात कॅसिनो काँग्रेसनेच आणले, असेही ते म्हणाले.

मध्यावधी निवडणुका नाही

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असेही सरदेसाई म्हणाले. जे सध्या सत्तेत नाहीत त्यांना मध्यावधी निवडणुका हव्या आहेत. त्याचबरोबर जे पडेल आमदार आहेत किंवा सत्तेत असून ज्यांना हवे ते मिळाले नाही त्यांनाही मध्यावधी निवडणुका हव्या आहेत, असे सांगत त्यांनी मायकल लोबो यांच्या विधानावरही टीका केली.

Related posts: