|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पाकमधील अल्पसंख्य स्त्रियांचे दुर्दैव…

पाकमधील अल्पसंख्य स्त्रियांचे दुर्दैव… 

धर्मनिंदेच्या आरोपातून पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आसियाबीबीला निर्दोष मुक्त केलं आहे. 2010 साली या गरीब ख्रिश्चन शेतमजूर स्त्रीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आपल्या मुस्लिम शेजाऱयांना ती ज्या पाण्याच्या पेल्यामधून पाणी देत होती, त्यामधूनच ती स्वतःही पाणी पीत असल्याचं आढळलं. या आरोपावरून एखाद्या व्यक्तीस फाशी सुनावणं, हेच मुळात डोकं फिरल्याचं लक्षण होतं. मात्र न्यायालयाने पाकिस्तानमधील धर्मनिंदेच्या कायद्याबद्दल प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. तर आसियाच्या हातून गुन्हा झाला नसून, तिच्याबाबत इतरांनी गुन्हा केला आहे, असं न्यायालयाचं मत बनलं. तिच्याविरुद्धची मूळ तक्रार सत्यात असत्याची भर टाकून गुदरण्यात आली होती. पाकिस्तानात हिंदू, शीख, अहमदिया, ख्रिश्चन यांच्यावर अन्याय-अत्याचार होत असल्याच्या बातम्या नेहमीच वाचायला मिळतात. तिथल्या धार्मिक असहिष्णुतेबद्दल काय बोलायचं? धर्मनिंदेच्या कायद्याबद्दल सवाल उपस्थित करणं आणि मानवतापूर्ण मूल्यांचा आग्रह धरणं, हेच तिथे पाप समजलं जातं. अशा व्यक्तींना ठार मारण्यात येतं. आसियाच्या बाजूने उभे राहणारे पंजाब प्रांताचे राज्यपाल सलमान तासीर तसंच शहबाज भट्टी या दोघांना जिवे मारण्यात आलं. आज आसियाबीबीला निर्दोष मानणाऱया न्यायाधीशांनाही खतम करण्याच्या धमक्मया दिल्या जात आहेत. तुम्ही न्यायालयीन निर्णयाचा आदर करा, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी तेथील धार्मिक-राजकीय पक्षांना दिला. पण नंतर एकदम माघार घेतली आणि तिथल्या तथाकथित धर्मरक्षक टोळय़ांशी वाटाघाटी सुरू केल्या. आता आसियाला न्यायालयाने सोडून दिलं असलं, तरी ती पाकमध्ये सुरक्षित नाही. अशावेळी तिला व तिच्या कुटुंबीयांना भारतासारख्या देशांनी आश्रय दिला पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शेकडो लोकांनी या निर्णयाविरुद्ध निदर्शनं करण्यास सुरुवात केली आहे. भारतात शबरीमल मंदिरात स्त्रियांना प्रवेश देण्याबबात न्यायलयाने निर्णय देऊनही, प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तो निर्णय राबवू दिला नाही. आमच्या धार्मिक प्रथा-परंपरांमध्ये न्यायालयाने लक्ष घालू नये, असं त्यांचं म्हणणं. पण मग मुस्लिम धर्मातील तिहेरी तला˜ाढ पद्धत मोडण्यात आल्यावर जेव्हा त्या धर्मीयांतून विरोध सुरू झाला, त्यावेळी आमच्या मुस्लिम बहिणींसाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्र सरकारने सांगितलं होतं. शबरीमलमधील हस्तक्षेप मान्य नसेल, तर मग तिहेरी तला˜ाढमधील ढवळाढवळ कशी काय मान्य होते, असा प्रश्न विचारला जाणारच.

या आसियाबीबीला चार मुलं आहेत. शिक्षा सुनावली गेल्यापासून तिच्या डोळय़ांसमोर सतत मरण दिसत होतं. तिची शिक्षा माफ व्हावी म्हणून व तिच्या जामिनासाठी तिचे वकील धडपडत होते. इस्लामचा अपमान केला, तर पाकिस्तानात तो घोर अपराध मानला जातो. गेल्या तीस वर्षांत जवळपास 1500 लोकांना धर्मनिंदा केल्यावरून सजा ठोठावण्यात आली आहे. आसियाला प्रथम जेव्हा सजा सुनावण्यात आली, तेव्हा पाकिस्तानातील ख्रिश्चनधर्मीय साहजिकच खवळले होते. धर्मनिंदा केली आहे की नाही, हे धर्मांध टोळय़ा ठरवणार. तसे पुरावे गोळा करणार आणि पोलीस व सरकार त्यांना साथ देणार, ही पाकमधील वस्तुस्थिती आहे.

           काय होती घटना

आसियाबाबत घडलेली कथित धर्मनिंदेची घटना काहीशी अशी होती-आसियाने 2009 सालच्या उन्हाळय़ात एका विहिरीतलं पाणी बादलीने काढलं आणि तिथे असलेला पेला उचलून पाणी प्यालं. आसपासच्या बायांनाही तिने पाणी दिलं. तेव्हा एका स्त्रीने तिला अडवलं आणि एका ख्रिस्ती स्त्रीने स्पर्श केल्यामुळे हे पाणी ‘हराम’ झालं, असं ती म्हणू लागली. त्यावर आसियाने उत्तर दिलं की, येशू व पैगंबर यांनी आपल्या या कृत्याकडे एकाच नजरेतून पाहिलं असतं. तिचं उत्तर ऐकून त्या स्त्रिया संतापल्या आणि आसियाने येशूची तुलना पैगंबरांशी केलीच कशी, असा जाब विचारू लागल्या. तिने इस्लाम स्वीकारला, तरच या पातकातून तू वाचू शकतेस, असं त्या म्हणू लागल्या. मी माझ्या धर्मावर श्रद्धा ठेवते, तेव्हा मी तो बदलणार नाही, असं मग आसियाने ठणकावलं. बोलताना पैगंबरांशी तुलना करत, येशू ख्रिस्ताचं तिने कौतुक केलं. याबद्दल राग येऊन, तिच्यावर धर्मनिंदेचा आरोप ठेवण्याचा प्रकार घडला. एका छोटय़ा घटनेचा भलताच परिणाम होऊन, आसियाचं जगणंच पणाला लागलं…

पाकिस्तानमध्ये सध्या तेहरीके लब्बइक पाकिस्तान (टीएलपी) हा प्रभावशाली इस्लामी पक्ष आहे. सार्वत्रिक निवडणुकात एकूण चार कोटी मतांपैकी दोन कोटी वीस लाख मतं या पक्षानेच मिळवली. आसियाच्या मुक्ततेविरुद्ध आंदोलन करण्यात हाच पक्ष आघाडीवर आहे. इमरान खानने सत्तेवर आल्यानंतर प्रिन्स्टन विद्यापीठाचे अर्थतज्ञ आतिफ मियाँ यांना आर्थिक सल्लागार मंडळावर घेतलं. पण ते आहेत अहमदिया पंथाचे. त्यामुळे त्यांना तुम्ही घेतलंच कसं, असा सवाल टीएलपीने केला. इमरान यांनी लगेच ही नियुक्ती रद्द करून टाकली. सलमान तासीर यांची 2011 साली जी हत्या झाली, ती धर्मनिंदेच्या कायद्यात बदल करावा, ही मागणी ते करत असल्यामुळे. त्यांचा अंगरक्षक मुमताज कादरी यानेच त्यांना ठार मारलं. हा कादरी म्हणजे, एखादा नायक आहे, अशा पद्धतीने टीएलपीने त्याचा गौरव करण्यास सुरुवात केली. म्हणजे पाकिस्तानात आज सलमान तासीर यांची फारशी कोणी आठवण काढत नाही. मात्र कादरी म्हणजे जणू धर्मयोद्धाच ठरला आहे. आसियाबीबीला नरम वागणूक दिल्यास, किंवा काही सवलती दिल्यास, त्याचे भंकर परिणाम होतील अशी धमकी टीएलपीने दिली आहे. आता सवलत म्हणजे, आसियाला तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने परदेशात जाण्याची परवानगी मिळणं. तिला निर्दोष ठरवणाऱया न्यायाधीशांना मारून टाकलं पाहिजे, अशी घोषणा टीएलपीचे अध्यक्ष पीर अफजल कदरी यांनी केली आहे. खरं तर आशियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हाच जगभरातून त्याचा निषेध झाला होता. पोप फ्रान्सिस यांनीही आसियाचं कौतुक केलं होतं.  पाकिस्तानातील बहुसंख्याक मुस्लिम स्त्रियांनाही घरात व समाजात जो सन्मान मिळाला पाहिजे, तो मिळतोच असं नाही. अल्पसंख्य समाजातील स्त्रियांची तर बुरीच हालत. एकतर अल्पसंख्य म्हणून जन्माला येणं हाच पाकमध्ये गुन्हा आहे आणि त्यात स्त्रीचं भागधेय काय आहे, हे सांगायलाच नको…

नंदिनी आत्मसिद्ध

Related posts: