|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » यंदा रसिकांसाठी चित्रपटांची मेजवानी

यंदा रसिकांसाठी चित्रपटांची मेजवानी 

पाडव्याच्या मुहुर्तावर ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ व ‘आणि डॉ. गिरिष घाणेकर’ होणार प्रदर्शित

प्रतिनिधी/ सांगली

दिपावली सण मोठा नाही आनंदाला तोटा या उक्तीप्रमाणे दिवाळीमध्ये गोडधोड फराळ, नवीन कपडे, दिवाळी अंक यांची मेजवानी लुटतात. यात भरीस भर म्हणून सणातील पाडव्याच्या मुहुर्तावर एक हिंदी व एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे चित्रपट रसिकांसाठी यंदाही दिवाळीमध्ये मनोरंजनाची पर्वणीच साधून आली आहे.

दरवर्षी दिवाळीच्या सणामध्ये रसिकांच्या मनोरंजनासाठी सुट्टय़ांची संधी साधून अनेक हिंदी-मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतात. यावर्षीही एक नवीन हिंदी व एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. ठग्ज ऑफ हिंदुस्थान हा हिंदी चित्रपट रसिकांसाठी यंदा पाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आमिताभ बच्चन यांच्यासह मिस्टर परफेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणारा अमिर खान, कॅटरिना कैफ असे एका पेक्षा एक दिग्गज कलाकार झळकणार असल्याने रसिकांसाठी सणासुदीच्या सुट्टीतील मेजवानीच चालून आली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱया या चित्रपटाचे टेलर टिव्हीवर गेले महिनाभर झळकत असल्याने याकडेही रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱया या चित्रपटाच्या गाण्यांनाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. अमिरखान व अमिताभ यांचा यांचा स्पेशल चाहता वर्ग आहे. त्यामुळे चाहत्यांकडून या चित्रपटाचे जोरदार स्वागत होत असून, जगभरातील सिनेरसिक या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत.

 तर गतवर्षीच्या दिवाळीत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नसल्याने मराठी रसिकांची मात्र घोर निराशा झाली होती. पण यंदा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा मराठी चित्रपट पाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होत आहे. सुबोध भावे यांचाही चाहता वर्ग मोठा असून, त्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. मराठीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे डॉ. गिरिष घाणेकर या अभिनेत्याच्या जीवनसंघर्षावर हा चित्रपट बेतला आहे. जितके चंदेरी जीवन ते दिलखुलास जगले, तसेच त्यांचे आयुष्यही कमालीचे इंटरेस्टिंग होते. या चित्रपटात नक्की काय दडले आहे, याचा गुरुवारीच उलगडा होणार आहे. याचे बरेच चित्रण सांगली व आसपासच्या परिसरात झाले असून, नाटय़पंढरीतील अनेक नावाजलेले कलाकार यात चमकले आहेत. त्यामुळे सांगलीकरांनाही या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. याचा ट्रेलरही रसिकांना आवडत असून, घाणेकर यांचा ‘एकदम कडक’ हा डायलॉगही सध्या लोकप्रिय होत आहे.

या दोन्हीही चित्रपटांचे ऍडव्हान्स बुकींग सध्या सुरु झाले असल्याने, गेल्या दोन दिवसांपासून रसिकांची तिकिट खिडकीवर आगाऊ आरक्षणासाठी हळूहळू गर्दी होत आहे. त्यामुळे या दिवाळीत हिंदी व मराठी अशी स्पर्धा असून, नक्की यात कोण बाजी मारणार, याचे चित्र लवकरच दिसून येईल.