|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऊसबिल आंदोलनाला शेतकऱयांचा प्रतिसाद

ऊसबिल आंदोलनाला शेतकऱयांचा प्रतिसाद 

वार्ताहर/ अथणी

अथणी तालुक्यातील साखर कारखान्यांनी 2017-18 च्या गळीत हंगामातील थकीत बिले द्यावीत. मगच यंदाचा गळीत हंगाम चालू करावा यासाठी शेडबाळ (ता. कागवाड) येथील शेतकरी कुमार रायाप्पा माकानावर यांनी अथणी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह चालू केला असून आज सत्याग्रहाचा चौथा दिवस असून त्यांना पाठिंबा मिळत आहे.

यावेळी माकानावर म्हणाले, गेल्या वर्षात फक्त कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 2900 प्रतिटन बिल दिले आहे. त्यामध्ये शिरगुप्पी शुगर, उगार शुगर, केंपवाड शुगर व रेणुका शुगर यांनी घोषणा केल्याप्रमाणे बिल दिलेले नसून केवळ  2500 रुपये बिल दिले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे  कारखाने जोपर्यंत बिल देत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी चिकोडी जिल्हा निजद रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश हलोळी यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, सध्या साखरेचा दर घसरल्याचे कारण पुढे करुन कारखान्यांनी बिल देणे टाळू नये. लवकरच खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली अथणी तालुक्यात आंदोलन करण्यात येणार आहे.  त्यात होणाऱया नुकसानीस साखर कारखाना प्रशासन जबाबदार राहिल. कागवाड मतदारसंघातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक कारखान्याचे बिल देण्यास भाग पाडावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अथणी उत्तर भागाचे लढाऊ नेते बी. एस. पाटील म्हणाले, शेतकऱयांचा कारखाना प्रशासनाने अंत पाहू नये. वेळीच निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलनास हिंसक वळण लागेल, असा इशारा दिला. याप्रसंगी शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी दरिगौडा इराज, सिद्धगौडा पाटील, विनोद सौंदत्ती, राजू मडवाळ, शितल पाटील, रविंद्र घाटगे, राजू पोतदार, प्रकाश हळोळी आदी उपस्थित होते.