|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बिबटय़ाने पाडला शेळीचा फडशा

बिबटय़ाने पाडला शेळीचा फडशा 

वार्ताहर/ कुद्रेमनी

भक्ष्याच्या शोधार्थ कुद्रेमनी गावच्या शेतवडीत फिरणाऱया सदर बिबटय़ाने शनिवारी वैजनाथ डोंगर परिसरातील जंगलभागात शेळीचा फडशा पाडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी सायंकाळी 4 वाजता देवरवाडी येथील शेतकरी शंकर कांबळे हे बकरी घेऊन डोंगरात गेले होते. बिबटय़ाने अचानक हल्ला करून त्याने शेळीला ठार केले. शेतकऱयाच्या ओरडण्यामुळे बिबटय़ाने शेळीला तिथेच टाकून पळ काढला. शुक्रवारी कुद्रेमनीच्या बांबर शेतवडीत सदर बिबटय़ा शेतकऱयांच्या निदर्शनास आला. बांबर परिसर, सुपे कुरण, देवरवाडी, वैजनाथ डोंगर जवळजवळ आहेत. या भागात या प्राण्याचा सर्रास वावर आहे.

सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे

शुक्रवारी कुद्रेमनी येथील शेतकरी रघू देवण व प्रकाश कांबळे शेतात काम करत असताना त्यांना बिबटय़ाचे जवळून दर्शन झाले होते. प्रकाश कांबळे यानी 20-25 फूट अंतरावरून मोबाईलमध्ये व्हीडिओ चित्रण केले होते. सदर चित्रिकरण व्हायरल झाले असून भक्ष्याच्या शोधार्थ बिबटय़ा जंगल भागात फिरत असून सतर्कता व सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी वनअधिकाऱयांनी सांगितले.

गेल्या सहा-सात वर्षांपासून बिबटय़ाचा या भागात संचार आहे. रामलिंग पाटील, रवि नाईक, मारुती बडसकर, प्रकाश पाटील, मधुकर देवण, राजू पाटील आदी अनेक शेतकऱयांच्या कुत्र्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत.

या भागातील शेतकऱयांनी पडीक जमिनीत काजूची लागवड केली आहे. यामुळे रानडुक्कर, गव्यांकडून दरवर्षी पिकांची मोठी हानी होते. ऐन सुगीत हे जंगली
प्राणी रात्रीच्या वेळी भात, बिन्स, मका, ऊस, भुईमूग पिकाचे नुकसान करतात.  रात्रीच्यावेळी शेतकऱयांना कंदीलाच्या उजेडात पिकांची राखण करावी लागते. त्यावेळी ते एकटेच असतात. त्यामुळे जीव मुठीत घेऊन त्यांना रात्र काढावी लागते.

पण आमच्या रक्षणाचे काय? : मधुकर देवण (10डीआय 34)

गेल्या सात वर्षांपासून जंगली प्राण्यांची या भागात दहशत आहे. शेतात घरे असल्यामुळे कुटुंबासह जनावरे घेऊन आम्ही शेतावर राहतो. रखवालीसाठी पाळलेल्या अनेक कुत्र्यांचाही जंगली प्राण्यांनी फडशा पाडला आहे. रात्रीच्यावेळी पिकांना शेतात पाणी सोडावे लागते, दूध घेऊन गावात यावे लागते, मुले शाळेला ये-जा करतात. धोका पत्करून आम्ही जीवन जगत आहोत. वन्य प्राण्यांचे रक्षण करणे योग्य आहे. पण आमच्या रक्षणाचे काय? यावर वन्य अधिकाऱयांनी उपाय सुचवावा, असे ते म्हणाले.

प्रकाश कांबळे (10डीआय 33)

आम्ही गावच्या पश्चिमेला थोडय़ा अंतरावर शेतवडीत राहतो. घराशेजारी काजू बाग व माळरान शेत आहे. शुक्रवारी दुपारी शेतात मिरचीची देखभाल करण्यासाठी  गेलो होतो. त्यावेळी माझ्या सोबत माझा नातेवाईक होता. चांगली शेती कशी करायची यावर आमची चर्चा सुरू होती. अचानक मागे मान वळली तर भलामोठा बिबटय़ा निदर्शनास आला. भीतीने भिंबेरी उडाली. कसे-बसे आडाला गेलो. त्यावेळी बिबटय़ा ऊसमळय़ाच्या दिशेने जात होता. थोडावेळ तो बांधावर बसला. धाडस करून मोबाईलमध्ये त्याची छायाचित्रे टिपली. पण आता या प्रसंगामुळे मनात भीती वाटते. वनखात्याने या प्राण्याचा बंदोबस्त करावा. बिनधास्तपणे शेतात जाणे, काम करणे याची मनात आता भीती लागून राहिली आहे.

बिबटय़ाच्या वावरामुळे शेतकरी भयभीत

काकती : हिंडाल्को परिसरात गुरुवारी रात्री बिबटय़ाचा वावर असल्याचे समजताच काकती, होनगा परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या परिसरात भात सुगीचा हंगाम जोरात सुरू आहे. रात्रीच्यावेळी मळणीसाठी शेतकऱयांना शेतात जावे लागत आहे. त्यातच मजुरांचा तुटवडा असल्याने घरातील सर्वजणांना शेती कामासाठी बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे शिवारात एखादे कुत्रे जरी पळताना पाहिले तरी शेतकरी भयभीत होत आहेत. तसेच दुर्गम भागातील जुमनाळ, सोन्नटी, मुत्तेनट्टी, हेग्गेरी आदी भागातील नागरिक यामुळे धास्तावले आहेत. त्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱयांनी सदर बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.