|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » शेवटच्या चेंडूवर भारताचा विजय

शेवटच्या चेंडूवर भारताचा विजय 

तिसऱया सामन्यात 6 गडय़ांनी मात, सामनावीर धवन, पंतची अर्धशतके

वृत्तसंस्था / चेन्नई

शिखर धवन व ऋषभ पंत यांच्या फटकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यांत विंडीजचा 6 गडय़ांनी पराभव करून मालिकेत 3-0 असे क्लीन स्वीप साधले. 62 चेंडूत 92 धावांची खेळी करणाऱया शिखर धवनला सामनावीराचा बहुमान मिळाला.

निकोलस पूरनने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर विंडीजने 20 षटकांत 3 बाद 181 धावा जमवित भारताला 182 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताने रोहित शर्मा (4) व लोकेश राहुल (17) लवकर बाद झाले असले तरी धवन व पंत यांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाचा विजय साकार केला. 19 व्या षटकांत पंतला कीमो पॉलने त्रिफळाचीत केले त्यावेळी भारताच्या 175 धावा झाल्या होत्या. पंतने 38 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा तडकावल्या तर धवन शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार, 2 षटकार ठोकले. त्याने या वर्षात टी-20 मधील एक हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. धवन-पंत योंनी तिसऱया गडय़ासाठी 130 धावांची निर्णायक भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर मनीष पांडेने दिनेश कार्तिकसमवेत विजयी धाव घेतली. विंडीजच्या पॉलने 2, थॉमस व ऍलेन यांनी एकेक बळी मिळविले. विंडीजला भारत दौऱयात फक्त एक सामना जिंकता आला तर काही सामन्यांत त्यांना निसटते पराभव स्वीकारावे लागले.

पूरनचे झंझावाती अर्धशतक

नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि शाय होत व हेतमेर यांनी अर्धशतकी सलामी देत विंडीजला चांगली सुरुवात करून दिली. सातव्या षटकात होपला चहलने वॉशिंग्टन सुंदरकरवी झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. होपने 22 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार व एका षटकारास 24 धावा फटकावल्या. हेतमेयरही फार वेळ टिकला नाही. त्याला नवव्या षटकांत चहलनेच कृणाल पंडय़ाकरवी झेलबाद केले. हेतमेरने 21 चेंडूत 4 चौकार, एका षटकाराच्या मदतीने 28 धावा काढल्या. मात्र दिनेश रामदिन लवकर बाद झाला. त्याला सुंदरने त्रिफळाचीत केले. त्याने 15 चेंडूत 15 धावा काढताना एक षटकार मारला. 13 व्या षटकांत 3 बाद 94 अशी स्थिती असताना डॅरेन ब्रॅव्हो व पूरन ही जोडी जमली आणि दोघांनी चौफेर फटकेबाजी करीत संघाला भक्कम स्थितीत नेले. शेवटच्या सात षटकांत या जोडीने 86 धावा झोडपल्याने विंडीजला दोनशेच्या जवळपास मजल मारता आली. विंडीजने शेवटच्या 5 षटकांत तब्बल 63 धावा काढल्या. त्यापैकी 23 धावा त्यांनी शेवटच्या षटकात काढल्या. दोघांमध्ये पूरन जास्त आक्रमक होता. त्याने केवळ 25 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी करीत नाबाद 53 धावा तडकावल्या. त्याचा जोडीदार ब्रव्होने 37 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 43 धावांचे योगदान दिले. भारतातर्फे चहलने 2 गडी बाद केले तर सुंदरने एक बळी टिपला.

धावफलक

विंडीज : शाय होप झे. सुंदर गो. चहल 24 (22 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), हेतमेर झे. कृणाल गो. चहल 26 (21 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), ब्रॅव्हो नाबाद 43 (37 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), रामदिन त्रि. गो. सुंदर 15 (15 चेंडूत 1 षटकार), निकोलास पूरन नाबाद 53 (25 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), अवांतर 20, एकूण 20 षटकांत 3 बाद 181.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-51, 2-62, 3-94.

गोलंदाजी : खलील अहमद 4-0-37-0, वॉशिंग्टन सुंदर 4-0-33-1, भुवनेश्वर 4-0-39-0, कृणाल पंडय़ा 4-0-40-0, चहल 4-0-28-2,

भारत : धवन झे. पोलार्ड गो. ऍलेन 92 (62 चेंडूत 10 चौकार, 2 षटकार), रोहित शर्मा झे. ब्रेथवेट गो. पॉल 4 (6 चेंडूत 1 चौकार), राहुल झे. रामदिन गो. थॉमस 17 (10 चेंडूत 4 चौकार), पंत त्रि.गो. पॉल 58 (38 चेडूत 5 चौकार, 3 षटकार), पांडे नाबाद 4 (6 चेंडू), कार्तित नाबाद 0, अवांतर 7, एकूण 20 षटकांत 4 बाद 182.

गडी बाद होण्याचा क्रम :1-13, 2-45, 3-175, 4-181.

गोलंदाजी : पिएरे 2-0-13-0, थॉमस 4-0-43-1, पॉल 4-0-32-2, बेथवेट 4-0-41-0, पोलार्ड 3-0-29-0, ऍलेन 3-0-23-1.