|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वारकरी भवनास आ. निलमताई गोऱहेंचा सकारात्मक प्रतिसाद

वारकरी भवनास आ. निलमताई गोऱहेंचा सकारात्मक प्रतिसाद 

प्रतिनिधी/ फलटण

शासनाच्या माध्यमातून पालखी मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर, पालखीतळासाठी स्वतंत्र कायम स्वरुपी जागा आदी विचार सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु असताना फलटण शहरात प्रशस्त वारकरी भवन सर्व सुविधांसह उभारले जावे, अशी मागणी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके यांनी शिवसेना विधान परिषद ज्येष्ठ सदस्या आ. निलमताई गोर्हे यांच्याकडे केली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

 शिवसेना नेत्या, आमदार निलमताई गोर्हे कुटुंबियांसमवेत गोंदावले येथे दर्शनासाठी जात असताना चैतन्य जप प्रकल्प 19 वे राज्यस्तरिय शिबिर आणि सांप्रदायिक किर्तन महोत्सव, संत संमेलन व सत्संग सोहळ्यासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटी प्रांगणात उभारण्यात येत असलेल्या प्रशस्त मंडपाची पाहणीसाठी थांबल्या. या शिबिर व महोत्सवाची माहिती घेताना सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी त्यांचा संस्थेच्यावतीने यथोचित स्वागत केल्यानंतर त्यांना या महोत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली. 

 शासन पालखीतळ आणि पालखी मार्गाच्या विस्तारिकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवित असताना या वारकरी भवनासाठी किमान एक एकर जागा राखून ठेवून त्यावर वारकरी भवन व अन्य सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत त्यासाठी चौधरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जागेची निवड करावी, भविष्यात सुरु होणाऱया  रेल्वेचा लाभ होण्यासाठी हे वारकरी भवन रेल्वे स्थानकालगत उभारणे सोईचे ठरेल, अशी अपेक्षाही सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी यावेळी व्यक्त केले. 

 आमदार निलमताई गोर्हे यांनी या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देतानाच शक्य असेल तर एकादी जागा सुचवा त्याचे 7/12 उतारे उपलब्ध करुन द्या, किंवा जागा तुम्ही मिळवा त्यावर वारकरी भवन व अन्य सुविधा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करु असे आश्वासन दिले. तसेच ही मागणी अत्यंत रास्त आणि योग्य असल्याने आपण त्यासाठी निश्चित प्रयत्न करु, श्रीराम एज्युकेशन सोसायटी प्रांगणात सुरु होणाऱया चैतन्य जपप्रकल्प राज्यस्तरिय शिबिर आणि सांप्रदायिक किर्तन महोत्सव, संत संमेलन व सत्संग सोहळ्यास आमदार निलमताई गोर्हे यांनी शुभेच्छा दिल्या. 

 फलटण शहराला धार्मिक व ऐतिहासिक वारसा आहे. सदगुरु हरिबुवा महाराज, प. पू. गोविंद महाराज उपळेकर आदी संत महंतांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. महाराष्ट्रभर किंबहुना त्याबाहेर अन्य प्रांतातही विस्तारलेल्या महानुभाव पंथाची ही पावन भूमी किंबहुना या धर्माच्या संस्थापकांचे चक्रपाणी महाराजांचे हे जन्मस्थान त्याचप्रमाणे येथे छ. शिवरायांची सासुरवाडी, छ. संभाजी महाराजांचे आजोळ म्हणूनही फलटणला वेगळे स्थान आहे. त्यापलीकडे गेल्या अनेक वर्षापासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे जाताना येथे विसावतो, प्रभू  श्रीरामासह अनेक हिंदू देवतांची पुरातन मंदिरे येथे आहेत. त्यापार्श्वभूमीवर येथे वारकरी भवनाची उभारणी केली पाहिजे अशी मागणी यावेळी सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी केली. 

Related posts: