|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » म्यानमारच्या भीतीने रोहिंग्या मुस्लीम पसार

म्यानमारच्या भीतीने रोहिंग्या मुस्लीम पसार 

वृत्तसंस्था/ तेकनाफ

 रोहिंग्या मुस्लीम शरणार्थी चालू आठवडय़ातच म्यानमारला परत पाठवण्यात येईल या भीतीने बांगलादेशच्या शिबिरांतून पलायन करत आहेत. रोहिंग्या समुदायाच्या नेत्यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे. बांगलादेशचे अधिकारी रोहिंग्या शरणार्थींना गुरुवारपासून बौद्धबहुल म्यानमारमध्ये परत पाठवण्याची योजना आखत आहेत.

रोहिंग्यांनी म्यानमारमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात धाव घेतली होती. संयुक्त राष्ट्रसंघाने याप्रकरणी म्यानमारवर कठोर शब्दांत टीका केली होती. म्यानमारमध्ये बळजबरीने पाठवले जाईल, या भीतीने शिबिरात राहणाऱया लोकांना ग्रासले असून ज्यांना सर्वात प्रथम परत पाठविले जाणार होते, ते शिबिरातून पसार झाल्याचे सांगण्यात आले.

शरणार्थींना सातत्याने मायदेशी परत जाण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत. परंतु याच्या उलट शरणार्थी भयभीत होऊन शिबिरातून पळत असल्याचा दावा जामतोली शरणार्थी शिबिराचे पदाधिकारी नूर इस्लाम यांनी केला आहे. योजनेंतर्गत गुरुवारपासून सुमारे 2260 रोहिंग्या मुस्लिमांना कॉक्स बाजार जिल्हय़ाच्या सीमेतून मायदेशी पाठविले जाणार आहे.

बांगलादेश आणि म्यानमारमध्ये याकरता रितसर बोलणी झाली असून करार देखील झाला आहे. म्यानमारने रोहिंग्यांना स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने बांगलादेशने शरणार्थींना परत पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. भारताने देखील काही रोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठविण्यास यश मिळविले आहे. भारताच्या प्रयत्नांना आलेले यश पाहता बांगलादेशने देखील म्यानमारसोबत सातत्याने याप्रकरणी चर्चा चालविली आहे.

Related posts: