|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » दहशतवादी हल्ल्यांचे केंद्र एकच

दहशतवादी हल्ल्यांचे केंद्र एकच 

अमेरिकेच्या उपाध्यक्षांशी पंतप्रधान मोदींची चर्चा : पाकिस्तानवर रोख

वृत्तसंस्था/ सिंगापूर  

जगात जेथे कुठे दहशतवादी हल्ले होतात, त्या सर्वांच्या पाठिमागे एकच केंद्र असल्याचे नेहमीच आढळल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यासोबत मोदींनी सिंगापूर येथे चर्चा केली आहे. जगात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे पुरावे एकच स्रोत तसेच ठिकाणाच्या दिशेने अंगुलीनिर्देश करत असल्याचे विधान करत मोदींनी पाकिस्तानला दहशतवादाचे जन्मस्थळ ठरविले आहे.

पूर्व आशिया संमेलनाव्यतिरिक्त मोदींनी पेन्स यांच्यासोबत द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्यांवर चर्चा केली. मोदींनी पाकिस्तानात दहशतवाद्यांनी निवडणुकीत भाग घेतल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. पेन्स यांनी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करत दहशतवाद विरोधात दोन्ही देशांच्या सहकार्याची प्रशंसा केली आहे.

मोदींनी पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता शेजारी देशाच्या कारवायांबद्दल पेन्स यांच्याशी चर्चा केली आहे. जगभरात झालेले अनेक दहशतवादी हल्ले हे पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीनींच केले आहेत. कॅलिफोर्निया येथे 2 डिसेंबर 2015 रोजी अंदाधुंद गोळीबार करून पाकिस्तानी दांपत्याने 14 जणांचा जीव घेतला होता. तर लंडनमध्ये जून 2017 मध्ये तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 7 जण ठार झाले होते. या हल्ल्यात देखील एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाच हात होता.

मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईदचा पक्ष पाकच्या निवडणुकीत सहभागी झाल्याबद्दल मोदींनी चिंता व्यक्त केली. हा प्रकार केवळ भारत आणि अमेरिकेसाठीच नव्हे तर पूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतेचे कारण असल्याचे मोदींनी बैठकीत म्हटल्याची माहिती विदेश सचिव विजय गोखले यांनी दिली आहे.

गुंतवणुकीसाठी भारत सर्वोत्तम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सिंगापूर येथील फिनटेक फेस्टिव्हलला संबोधित करताना भारत हे गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असल्याचे उद्गार काढले आहेत. सरकारकडून लोकांसाठी अनुकूल असे अनेक डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आल्याने वित्तीय सर्वसमावेशकतेचे स्वप्न साकारले जातेय. तंत्रज्ञानाने भारताच्या सार्वजनिक सेवांचे प्रशासन आणि वितरण व्यापक स्वरुपात बदलले असून नवोन्मेष, आकांक्षा आणि संधी निर्माण झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.

तंत्रज्ञान प्रतिस्पर्धा आणि शक्तीची नव्याने व्याख्या करत असून जीवनात बदल घडवून आणण्याच्या असंख्य संधींना जन्म देत
आहे.तंत्रज्ञानामुळे दुर्बल घटकांना अधिकारसंपन्न केले आहे. भारतात सुरू असलेल्या आर्थिक क्रांतीला या महोत्सवाने एकप्रकारे स्वीकृतीच दिल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.

Related posts: