|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » जोस बटलर, सॅम करनची अर्धशतके

जोस बटलर, सॅम करनची अर्धशतके 

इंग्लंडचा पहिला डाव 285 धावांत संपुष्टात

वृत्तसंस्था/ कँडी

सॅम करनने आपल्या पॉवर हिटिंगची क्षमता दाखवत झळकवलेले अर्धशतक आणि जोस बटलरचे अर्धशतक यांच्या बळावर इंग्लंडने खराब सुरुवातीवर मात करीत लंकेविरुद्धच्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्व बाद 285 धावांपर्यंत मजल मारली. दिवसअखेर लंकेने पहिल्या डावात 1 बाद 26 धावा जमविल्या होत्या. लंकेच्या परेराने 4, पुष्पकुमाराने 3 बळी मिळविले.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी निवडल्यावर 4 बाद 89 अशी त्यांची स्थिती झाली होती. पण बटलरने डाव सावरणारी खेळी केली आणि नंतर करनने आपली षटकार ठोकण्याची क्षमता दाखवत 6 षटकार ठोकल्याने इंग्लंडला तीनशेच्या जवळपास मजल मारता आली. करनने 119 चेंडूत 1 चौकार व 6 षटकारांसह 64 धावा फटकावल्या तर बटलरने 67 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 63 धावांचे योगदान दिले.

पहिली कसोटी जिंकून इंग्लंडने याआधीच लंकेवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. लंकेचा हंगामी कर्णधार सुरंगा लकमलने कीटन जेनिंग्सला पाचव्या षटकात बाद केल्यानंतर लंकेच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडची आघाडी फळी कापून काढली. इंग्लंडने पहिल्या सामन्यातील संघचा कायम ठेवला. मात्र फलंदाजीच्या क्रमात बदल करताना बेन स्टोक्सला तिसऱया स्थानावर बढती दिली. पण स्टोक्सला  निर्णय सार्थ ठरविता आला नाही. त्याला 19 धावांवर दिलरुवान परेराने पायचीत केले. डावखुऱया फिरकीसमोर झगडण्याची रूटची वृत्ती या डावातही कायम राहिली. पुष्पकुमाराने त्याला 14 धावांवर बाद करून इंग्लंडच्या अडचणीत आणखी भर टाकली. व्यवस्थित खेळणारा सलामीवीर रॉरी बर्न्स 43 धावा काढून बाद झाल्यावर इंग्लंडची स्थिती 4 बाद 89 अशी झाली. सर्व बळी उपाहाराआधीच्या सत्रात बाद झाले.

बटलरची फटकेबाजी

उपाहारानंतरच्या सत्रात बटलरने लंकन गोलंदाजांवर प्रतिआक्रमण करताना अकिला धनंजयाला सलग 3 चौकार ठोकले आणि त्याने चेंडूस धाव या गतीने अर्धशतकही पूर्ण केले. 63 धावांवर पोहोग्चल्यावर पुष्पकुमाराला रिव्हर्स स्वीप मारताना तो बाद झाला. पहिल्या कसोटीत झुंजार शतक नोंदवणाऱया बेन फोक्सला त्या खेळीची पुनरावृत्ती यावेळी करता आली नाही. तो 19 धावा काढून यष्टीमागे झेलबाद झाला. आश्चर्याची बाब म्हणजे फोक्सने रिक्हय़ू घेतला असता तर तो नाबाद ठरला असता. कारण रिप्लेमध्ये चेंडूने त्याच्या बॅटला किंवा ग्लव्ह्जला स्पर्श केला नसल्याचे दिसून आले. शेवटच्या सत्रात करनने धमोकदार फटकेबाजी करून सामन्यात जान भरली. त्याने पाचव्या षटकारावर कसोटीमधील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने शेवटच्या गडय़ासाठी जेम्स अँडरसनसमवेत 60 धावांची भर घातली. पण त्यात जास्त वाटा करनचाच होता. अँडरसन 7 धावांवर नाबाद राहिला. पुष्पकुमाराने करनला करुणारत्नेकरवी झेलबाद करून इंग्लंडचा डाव 285 धावांवर संपुष्टात आणला. लंकेच्या पुष्पकुमाराने 61 धावांत 4, पुष्पकुमाराने 89 धावांत 3, धनंजयाने 80 धावांत 2 बळी तर लकमलला एक बळी मिळाला.

लंकेच्या डावालाही खराब सुरुवात झाली. रोशेन सिल्वाला 6 धावांवर आठव्या षटकांत लीचने त्रिफळाचीत केले. करुणारत्ने व नाईट वॉचमन पुष्पकुमाराने उर्वरित चार षटके पडझड होऊ न देता खेळून काढली. दिवसअखेर लंकेने 12 षटकांत 1 बाद 26 धावा जमविल्या असून ते अद्याप 259 धावांनी मागे आहेत. लंकेने या सामन्यात दोन बदल करताना निवृत्त झालेला हेराथ व जखमी कर्णधार देनेश चंडिमलच्या जागी पुष्पकुमारा व रोशेन सिल्वा यांना संघात स्थान दिले आहे.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव – बर्न्स 43 (81 चेंडूत 5 चौकार), जेनिंग्स 1 (8 चेंडू), स्टोक्स 19 (27 चेंडूत 2 चौकार), रूट 14 (23 चेंडूत 2 चौकार), बटलर 63 (67 चेंडूत 7 चौकार), मोईन अली 10 (23 चेंडू), फोक्स 19 (29 चेंडूत 3 चौकार), करन 64 (119 चेंडूत 1 चौकार, 6 षटकार), रशिद 31 (52 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), लीच 7 (13 चेंडूत 1 चौकार), अँडरसन नाबाद 7 (12 चेंडूत 1 चौकार), अवांतर 7, एकूण 75.4 षटकांत सर्व बाद 285.

गोलंदाजी : लकमल 1-44, डी. परेरा 4-61, पुष्पकुमारा 3-89, डी सिल्वा 0-4, धनंजया 2-80.

लंका प.डाव : करुणारत्ने खेळत आहे 19 (42 चेंडूत 1 चौकार), सिल्वा 6 (15 चेंडूत 1 चौकार), पुष्पकुमारा खेळत आहे 1 (15 चेंडू), एकूण 12 षटकांत 1 बाद 26.

गोलंदाजी : लीच 1-7, अँडरसन 0-8, करन 0-5, मोईन 0-6.

Related posts: