|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » ध्येय गाठण्यासाठी येणाऱया परिक्षांचे स्वागतच करावे

ध्येय गाठण्यासाठी येणाऱया परिक्षांचे स्वागतच करावे 

प्रतिनिधी /मडगाव :

आज जीवनातील प्रत्येक दिवस हा कसोटीचा असतो, परिक्षेचा असतो. या कसोटीतून जो बाहेर निघतो तो निकषाला पात्र ठरतो आणि म्हणून जीवनातील उच्चतम घ्येय गाठण्यासाठी आपल्यापुढे येणाऱया परिक्षांचे स्वागतच केले पाहीजे, असे उद्गार ‘तरुण भारत’चे ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ रायकर यांनी व्यक्त केले.

कुंकळ्ळी येथे श्री वीर विठ्ठल मंदिर नवयुवक संघाने आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील रांगोळी आणि आकाशकंदील स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात सन्माननीय पाहुणे या नात्याने श्री. रायकर बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर कुंकळ्ळीचे माजी आमदार राजन नाईक, श्री वीर विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष गिरीश केंकरे, श्री वीर विठ्ठल मंदिर नवयुवक संघाचे अध्यक्ष सोहन नाईक, परिक्षक कमलाक्ष प्रभुगावकर, गिरीश केंकरे व नारायण चितारी उपस्थित होते.

राज्य पातळीवरील या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना श्री. रायकर पुढे म्हणाले की स्पर्धा म्हटली की परिक्षा आली आणि परिक्षा म्हटली की निकष आला. शालेय जीवनापासून कोणतीही व्यक्ती परीक्षा देत देत पुढे येत असते. विविध परीक्षेसाठीचे निकष वेगवेगळे असतात. मात्र खरी पारख होते ती परीक्षेमुळे आणि त्यामुळे आपल्याला आणखी आत्मज्ञान प्राप्त होते आणि हेच आत्मज्ञान त्या त्या व्यक्तीचा विकास करीत असते, असेही श्री. रायकर म्हणाले.

केंद्रीय लोक सेवा आयोग जेव्हा प्रशासनासाठी अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा जाहीर करतो तेव्हा देशभरातील सुमारे 4 लाख उमेदवार परिक्षेला बसतात. मात्र प्राथमीक फेरीत सुमारे 50,000 उमेदवारांची निवड केली जाते आणि अंतिम फेरीत सुमारे 1000 उमेदवार निवडले जातात आणि हेच उमेदवार पुढे आयएएस अधिकारी म्हणून सरकार त्यांची जिल्हाधिकारी वा तत्सम जागी नियुक्त करते. परीक्षा नसती तर या 1000 आयएएस उमेवारांची निवड करणे कठीण झाले असते आणि म्हणून जीवनातील उच्चतम घ्येय गाठण्यासाठी आपल्यापुढे येणाऱया परिक्षांचे स्वागतच केले पाहीजे, असे श्री, रायकर म्हणाले आणि राज्य पातळीवरील या स्पर्धेचे आयोजन केल्याप्रकरणी श्री वीर विठ्ठल मंदिर नवयुवक संघाचे अभिनंदन केले.