एकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा

छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची बोचरी टीका काँगेसच्या लोकशाही प्रेमाची उडविली खिल्ली
नेहरूंनी देशात लोकशाही आणली म्हणून मोदींसारखा चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकला, अशी विघाने एक काँगेस नेता करीत आहे. आता काँगेसने गांधी-नेहरू घराण्यातील व्यक्ती वगळता एकातरी बिगर गांधी व्यक्तीला काँगेसचे अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्याची हिंमत दाखवावी आणि लोकशाहीचा आदर करावा. तसे केल्यास नेहरूंमुळे लोकशाही आली हे विधान मान्य करता येईल, अशी घणाघाती आणि खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केली.
छत्तीसगड राज्यात दुसऱया टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. भाजपचे प्रमुख प्रचारक या नात्याने मोदींनी या शहरात सभा घेतली. छत्तीसगड राज्यात भाजपच्या पंधरा वर्षांच्या काळात मोठा विकास झाला असून मुख्यमंत्री रमणसिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे, अशी प्रशंसा मोदींनी केली.
छत्तीसगडची निर्मिती अटलबिहारी वाजपेयी यांनी केली. ती अत्यंत शांततेने आणि सामंजस्याने झाली. कोणताही हिंसाचार किंवा विरोध झाला नाही. हे लोकशाहीचे आणि वाजपेयींसारख्या नेत्याचे यश आहे. भाजप नेहमी लोकशाही संवर्धनासाठी आघाडीवर असून काँगेसनेच अनेकवेळा सत्तास्वार्थासाठी लोकशाहीचा गळा घोटाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लोकशाहीचे कंत्राट एका कुटुंबाला देण्यात आलेले नाही. सर्व जनतेचा लोकशाहीवर अधिकार आहे. माझ्यासारखा सामान्य पार्श्वभूमीतून आलेला कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला, यावर काँगेसचा अद्यापही विश्वास बसत नाही. आजही तो पक्ष आणि त्याचे नेते यासाठी माझा द्वेष करतात. त्यामुळेच काँग्रेस नेते माझ्याबद्दल अद्वातद्वा भाषा उपयोगात आणतात, अशी टिप्पणी त्यांनी केली.
भाजपला मत म्हणजे विकासाला मत
सबका साथ सबका विकास हेच भाजपचे एकमेव तत्व असून त्याची अंमलबजावणी निर्धाराने सुरू आहे. बस्तर सारख्या दुर्गम भागात आमच्या सरकारने उत्तम रस्त्यांची निर्मिती केली. छत्तीसगड राज्याला उपासमारीपासून वाचविले. धान्याचे उत्पादन वाढविले. सलवा जुडूम सारख्या कार्यक्रमांमधून सुरक्षा दिली. जनधन योजना, उज्ज्वला योजना, गृहबांधणी योजना यांसारख्या योजनांमधून लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. काँगेसने केवळ आश्वासने देणे आणि खोटे आरोप करणे याशिवाय काहीच केलेले नाही, असा दावा त्यांनी केला.