|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सांखळी पालिका क्षेत्रात साधनसुविधांचा अभाव

सांखळी पालिका क्षेत्रात साधनसुविधांचा अभाव 

प्रतिनिधी/ सांखळी

सांखळी नगरपालिका क्षेत्रातील इंडोर स्टेडियम तसेच स्वीमिंग पूलाजवळ अस्वच्छता व साधनसुविधांचा अभाव असल्याबाबत सांखळी काँग्रेस ब्लॉक कमिटीने पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. या संबंधी संबंधित अधिकाऱयांना लेखी निवेदन सादर केले आहे. तसेच परिसराची पाहणी करून समस्या जाणून घेतल्याची माहिती दिली.

यावेळी काँग्रेस पी. सी. सी. सदस्य मंगलदास नाईक, काँग्रेस युवा अध्यक्ष सुबोध आमोणकर, रियाज सय्यद, भरत गावस, संदीप काणेकर, घनश्याम पेटकर, महेश गोसावी यांची उपस्थिती होती.

इंडोर स्टेडियमसाठी प्रशिक्षकाची नेमणूक करावी

सांखळी शहर व ब्राह्मीण भागातील अनेक विद्यार्थी, इतर लोक खेळण्यासाठी येतात. मात्र तेथे प्रशिक्षक नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच जीममध्ये साधनसुविधांचा अभाव असून तेथेही प्रशिक्षक नाही. सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन प्रशिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

स्वीमिंग पुलात अस्वच्छ पाणी

शहरातील शेकडो विद्यार्थी पोहण्यास येतात. मात्र स्वीमिंग पुलातील पाणी गढूळ असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष देऊन पंधरा दिवसाच्या आत येथील समस्या सोडवाव्यात. अन्यथा काँग्रेस ब्लॉक कमिटी पुढील कृती करण्यास सज्ज असेल, असा इशारा युवा काँग्रेस अध्यक्ष सुबोध आमोणकर यांनी दिला.