|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सनी आवळे खून प्रकरणी तिघांना अटक

सनी आवळे खून प्रकरणी तिघांना अटक 

कर्नाटकातील बागेवाडी येथून घेतले ताब्यात : संशयितामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथे शुक्रवारी झालेल्या सनी आवळे खून प्रकरणी एका अल्पवयीनासह तीन संशयित आरोपींना पोलिसांनी कर्नाटकमधील बागेवाडी येथून ताब्यात घेतले.  अक्षय दिलीप कोळी (वय 23) व आकाश अर्जुन बेळगांवकर (वय 19, दोघे रा. नेहरूनगर झोपडपट्टी, इचलकरंजी), अशी संशयितांची नावे आहेत.  गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सात तासात शिवाजीनगर पोलिसांनी संशयितांचा छडा लावला. मृत सनी आवळे याचा भाऊ नितीन आवळे यांने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वखार भाग येथे सनी आवळे याचा धारधार शस्त्रांनी खून झाल्याची घटना घडली होती. मारेकऱयांनी अत्यंत निर्दयी व अमानूषपणे त्याच्यावर कोयता व चाकूने 32 वार करून खून केला होता. घटनास्थळी मृताच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, उपाधिक्षक निलाभ रोहन यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पोलिसांना तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या. यावेळी अक्षय कोळी याचे आजोळ कर्नाटक येथील बागेवाडी गावात आहे. तो तेथे गेल्या असल्याची शक्यता गृहित धरून शिवाजीनगर पोलिसांची तपास पथके तिकडे रवाना झाली. त्याठिकाणी संशयित अक्षय कोळी, आकाश बेळगांवकर व त्यांचा एक अल्पवयीन  साथीदार असे तिघेजण पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी संशयितांकडून चाकू व एक कोयता जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, उपाधिक्षक निलभ रोहन , पोलिस निरिक्षक आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक रमेश हत्तीगोटे, भागवत मुळीक, पोलिस नाईक प्रशांत ओतारी, उदय पाटील, नागनाथ माळी, पोलिस काँस्टेबल विकास कुरणे, इजाज शेख, अर्जुन फातले यांनी केली.

 

चौकट करणे- किरकोळ वादाचे पर्यवसान भयानक खूनात

मयत सनी आवळे व संशयित आरोपी अक्षय कोळी, आकाश बेळगांवकर व एक अल्पवयीन हे मित्र होते. कांही वर्षापुर्वी दुर्गामाता मंडळाची स्थापना करून त्यामार्फत कांही उत्सवही त्यांनी पार पाडले होते. पण कांही कारणास्तव हे मंडळ फुटले व त्यांच्यामध्ये वितुष्ट आले. अनेक दिवसांपासून मयत सनी आवळे हा रागाने बघतो, टोमणे मारतो अशी तक्रार संशयितांनी सनीच्या घरच्यांना बोलून दाखवली होती. गुरूवार 15 रोजी त्यांच्या गल्लीतीलच एका लग्नावेळी परत एकमेकांकडे बघण्यावरून व टोमणा मारल्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. याचा राग मनात धरून अक्षय कोळी व इतर संशयितांनी सनी आवळे याचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Related posts: