|Sunday, September 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » अनिकेत-प्रियदर्शन पुन्हा एकत्र

अनिकेत-प्रियदर्शन पुन्हा एकत्र 

माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला.  नुकतेच लग्न झालेल्या दाम्पत्याची लग्नानंतरची गोष्ट आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. हॉरर कॉमेडी अशा जॉनरचा हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव या दोघांची जोडी प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांचे दिग्दर्शन करणारे राजीव रुईया यांनी सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केले आहे. या सिनेमात एकूण चार गाणी आहेत. स्वाती शर्मा आणि नकाश अझीझ यांच्या आवाजातील तू हाथ नको लावूस या गाण्याला राजू सरदार यांचे संगीत लाभले आहे. मी तुझीच साजणा हे सिनेमातील दुसरे गाणे असून ते अनिकेत आणि भाग्यश्रीवर चित्रित करण्यात आले आहे. स्वाती शर्मा यांनी हे गाणे गायले आहे. तर जवळ ये ना हे अनिकेत व भाग्यश्रीवर चित्रित करण्यात आलेले तिसरे रोमँटिक गाणे आहे. या गाण्याला स्वाती शर्मा आणि सुशांत दिवगीकर यांनी स्वरबद्ध केले आहे. या दोन्ही गाण्यांचे बोल अभय इनामदार यांनी लिहिले असून त्या गीतांना विवेक किर यांनी संगीतबद्ध केले आहे. गंगे हे सिनेमातील चौथे गाणे असून त्याचे बोल सुरेश पिल्लई यांनी लिहिले असून त्यांनीच स्वरबद्ध केले आहे. या गीताला प्रभाकर नलावडे यांनी संगीत दिले आहे.

प्रियदर्शन व अनिकेतसोबत भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भारत गणेशपुरे, स्वाती पानसरे, अंशुमन विचारे, पदम सिंह, अनुपम ताकमोघे, सुरेश पिल्लई यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची पटकथा अभिजित गाडगीळ तर संवाद संदीप दंडवते यांनी लिहिली आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल गाडा, अक्षय गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल  गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. येत्या 23 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.