|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 61 वर्षीय भारतीयाची अमेरिकेत हत्या

61 वर्षीय भारतीयाची अमेरिकेत हत्या 

अल्पवयीन मारेकऱयाला अटक 

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

भारतीय वंशाचे 61 वर्षीय सुनील एडला यांची अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये 16 वर्षीय मुलाने गोळय़ा झाडून हत्या केली आहे. अल्पवयीन मारेकऱयाला ताब्यात घेण्यात आले असले तरीही हत्येच्या कारणाचा उलगडा झालेला नाही.

सुनील यांच्यावर अत्यंत जवळून अनेक गोळय़ा झाडण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. सुनील हे अटलांटिक काउंटीमध्ये मागील 30 वर्षांपासून रात होते. शहरातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात ते कार्यरत होते. एडला हे मूळचे तेलंगणातील असून मेडक येथे त्यांचे घर आहे.

सुनील यांची गुरुवारी हत्या करण्यात आली असून रविवारी त्यांच्या मारेकऱयाला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सुनील यांच्यावर गोळय़ा झाडून त्यांच्या कारवर कब्जा केला होता. पोलिसांना तपासावेळी कार सापडली आहे.

नॉर्थ कॅरोलिनाच्या एव्हेन्यू रोडवे इनमध्ये रात्रपाळी केल्यानंतर घरानजीक पोहोचल्यावर सुनील यांच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. सुनील हे स्वतःच्या आईचा 95 वा वाढदिवस आणि नाताळ साजरा करण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी भारतात येणार होते. परंतु त्यापूर्वीच त्यांची हत्या करण्यात आली आहे. मारेकरी केवळ 16 वर्षांचा असून त्याच्याविरोधात हत्या, लूट, कार चोरणे आणि अवैधपणे हँडगन बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.