|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा 

प्रतिनिधी/ पणजी

आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस आमदारांसह आरटीआय कार्यकर्ते, अनेक संस्था, संघटना यांचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नागरिकांनी मिळून दोनापावला येथील मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानी मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आणलेले निवेदन यावेळी तेथे उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी शशांक त्रिपाटी यांच्याकडे सादर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी 48 तासांच्या आत राजीनामा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरील खर्चासाठी सरकारी तिजोरीतून कोटय़वधी खर्च करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. गोवा इंटरनॅशनल सेंटर येथे सर्व मोर्चेकरी एकत्र आले आणि त्यांनी तेथून मोर्चाला सुरूवात केली. पणजीतील आझाद मैदानावर पर्रीकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांचे बेमुदत उपोषण चालू आहे. त्यांना पाठिंबा दर्शवून अनेकजण या मोर्चात सहभागी झाले. काँग्रेस विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सिस सिक्वेरा, टोनी फर्नांडिस, नीळकंठ हळर्णकर, आलेक्स रेजिनाल्ड, क्लाफासियो डायस, फिली नेरी रॉड्रिग्स ही काँग्रेसची सर्व आमदार मंडळी मोर्चाला हजर होती.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त 

मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पर्रीकर यांच्या निवासस्थानी मोर्चा पोहोचताच तो पोलिसांनी अडविला. मोर्चेकरांना खुद्द पर्रीकर यांची प्रत्यक्ष भेट हवी होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. शेवटी मोर्चेकरांच्या नेत्यांनी तेथे उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांना निवेदन सादर केले आणि ते मुख्यमंत्र्यांना देण्याची विनंती केली.

प्रशासन ठप्प असल्याने नाराजी

गेले 9 महिने मुख्यमंत्री जनतेला भेटू शकलेले नाहीत. प्रमुख आणि महत्त्वाची खाती त्यांच्याकडे असल्यामुळे प्रशासन ठप्प झाले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आणि ते लवकरच पर्वरी येथील कार्यालयात येणार अशा खोटय़ा बातम्या पसरवण्यात येत आहेत. त्यांच्या आजारपणावर चालू असलेल्या खर्चामुळे सरकारी तिजोरीला कोटय़वधीचा फटका बसत असून गोव्याचे एकूण कर्ज 15658 कोटी झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

वित्त खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे अनेक विकासकामांना, प्रकल्पांना निधीच मंजूर होत नाही आणि ती कामे ठप्प झाली आहेत. खड्डेमय झालेले रस्ते, खुली गटारे याचेच दर्शन सर्वत्र होत असून विकासाचे नावच कुठे दिसत नाही. जनतेची कामे होत नाहीत. अशी परिस्थिती असल्याचे निवेदनात म्हटले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह सुमारे दीडशे जण मोर्चात सामील झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नाईलाजास्तव हा मोर्चा काढावा लागत आहे. त्यांना 48 तासांची मुदत देण्यात आली असून त्या कालावधीत राजीनामा न दिल्यास राजीनाम्यासाठी राज्यस्तरीय आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून मुख्यंमत्र्यांना देण्यात आला आहे.

Related posts: