|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » हिम्मत असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे

हिम्मत असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे 

प्रतिनिधी /पणजी :

आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या राजीनाम्याची मागणी करीत काँग्रेसने काढलेल्या मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी टीका केली. या मोर्चाचा निषेधही त्यांनी केला. या मोर्चाला काँग्रेसचे केवळ 9 आमदार उपस्थित होते. अन्य पाच आमदार कुठे गेले असा प्रश्नही त्यांनी केला.  सरकार बरखास्तीसाठी काँग्रेसने हिम्मत असेल तर न्यायालयात जावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

या अगोदर अन्य राज्यांचेही मुख्यमंत्री आजारी होते. श्रीमती जयललीता, बीजू पटनाईक हे मुख्यमंत्री आजारी होते. पण काँग्रेसने कधी त्यांच्या घरावर मोर्चा काढला नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी आहेत. त्यांनी आजारपणाचे सोंग घेतलेले नाही. गोव्याच्या विकासात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोठे योगदान दिले आहे. केंद्रात संरक्षणमंत्रीपदही त्यांनी भूषविले. काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणून सरकारमध्ये काम केले आहे. ते स्वत: मुख्यमंत्री होते आणि ते अशा गोष्टींना बळी पडतात याचे आश्चर्य वाटते असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने देशभरातील प्रसिद्धी माध्यमे गोव्यात आली आहेत. त्यामुळे देशभर प्रसिद्धी मिळणार म्हणून हा मोर्चा काढला, अशी टीका त्यांनी केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आजारी होते. त्यावेळी वाजपेयी विरोधक होते. पण त्यावेळी वाजपेयी किंवा जनसंघाने मोर्चा काढला नाही किंवा राजीनाम्याचीही मागणी केली नाही. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेही आजारी होते, पण त्यांच्याही राजीनाम्याची भाजपने मागणी केली नाही.

हिम्मत असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे

सरकार बरखास्त करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेस देत आहे. हिम्मत असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे असेही तेंडुलकर म्हणाले. सध्या काँग्रेसकडे कोणताही उपक्रम नाही. मुद्दे नाहीत म्हणून प्रसिद्धीसाठी काँग्रेस असे प्रकार करीत आहे. गोव्यात सरकार चांगले काम करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Related posts: