|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा-बेळगाव मार्गावर प्रवाशांच्या जीवाला धोका

गोवा-बेळगाव मार्गावर प्रवाशांच्या जीवाला धोका 

वाळपई /प्रतिनिधी :

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियोजनशून्य धोरणामुळे गोवा-बेळगाव दरम्यानच्या दोन्ही महामार्गांची दुरुस्ती एकाचवेळी हाती घेतल्याने त्याचा त्रास वाहनचालक तसेच प्रवासीवर्गाला होत आहे. गोवा-बेळगाव व्हाया अनमोड हा महामार्ग सध्या दुरुस्तीच्या कामामुळे बंद करण्यात आला असून त्यामुळे केरी चोर्ला या महामार्गावरील वाहतुकीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

चार दिवसापूर्वी हाती घेतलेली या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रणेला मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाढलेल्या वाहतुकीचा परिणाम म्हणून केरी, साखळी दरम्यान वाहतूक करणाऱया स्थानिक वाहनांना तसेच नागरिकांनाही त्रास सहन करावे लागत आहे.

अनमोड महामार्गाची दयनीय अवस्था

गोवा-बेळगाव व्हाया अनमोड या महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. प्रवास करणाऱया वाहनचालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारींची दखल घेत चार दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. ही दुरुस्ती जवळपास एक महिन्यापर्यंत चालणार असून तोपर्यंत सदर मार्गावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. यामुळे गोवेकरांना बेळगाव व इतर शहरात जाण्यासाठी सध्या चोर्ला महामार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

चोर्ला महामार्गावर ताण वाढला

चोर्ला महामार्ग अगोदरच अरुंद आहे. त्यामुळे सध्या मोठय़ा प्रमाणात होणाऱया वाहतुकीसाठी तो धोकादायक बनला आहे. त्याशिवाय जवळपास दहा किलोमीटरचा रस्ता घाटातून जात असल्याने याचा बराच त्रास प्रवासीवर्गाला सहन करावा लागत आहे. अशा अवस्थेत गेल्या चार दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वाळपई विभागातर्फे या रस्त्याचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. वाढलेल्या वाहतुकीमुळे दुरुस्तीच्या कामातही अडचणी येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रणेवर बराच ताण येत आहे.