|Sunday, September 22, 2019
You are here: Home » विविधा » 50 पुस्तके वाचणाऱया विद्यार्थ्यांना संमेलनाध्यक्ष लिहिणार कौतुकपत्र

50 पुस्तके वाचणाऱया विद्यार्थ्यांना संमेलनाध्यक्ष लिहिणार कौतुकपत्र 

पुणे / प्रतिनिधी :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन म्हणजे 6 डिसेंबरपर्यंत तिसरी ते बारावीपर्यंतच्या सर्व म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांच्या व जिल्हापरिषद, नगरपालिका/ मनपा तसेच सर्व खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी एक जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2018 दरम्यान किमान 50 पुस्तके वाचली असतील, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

अवांतर वाचन हे निरंतर शिक्षण असते व त्याद्वारे सशक्त वाचन संस्कृती निर्माण होते व अशाच देशात ज्ञानसत्ता निर्माण होते. म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टीची तसेच माहितीपर पुस्तके वाचावीत, असे महाराष्ट्रात विद्यार्थी व शिक्षकांना मी ठिकठिकाणी संबोधन करताना गेले वर्षभर आवाहन केले आहे, असे सांगत डॉ. देशमुख म्हणतात, डॉ आंबेडकर यांना बालवयापासून वाचनाची आवड होती व वाचन व व्यासंगामुळे ते एवढे मोठे महामानव झाले व त्यांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यांच्या स्मृतीला विद्यार्थ्यानी वाचन करून अभिवादन करावे, असे आवाहन महाराष्ट्रातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना देशमुख यांनी केले आहे. तसेच शिक्षक वर्गाने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना ही माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रमाणपत्रासह आपले नाव, गाव, शाळा व इयत्ता नमूद करून खालील पत्त्यावर या कालावधीत वाचलेल्या पुस्तकांची व लेखकांची नावे असलेले पत्र पाठवावे. लक्ष्मीकांत देशमुख, श्रीनिवास गार्डन, बी/2, केदारनाथ मंदिराजवळ, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे 411016. यापैकी सर्वाधिक पुस्तके वाचलेल्या दहा विद्यार्थ्यांना देशमुख स्वखर्चाने प्रत्येकी पाच पुस्तके भेट देणार आहेत.