|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रस्ते, पुलांसाठी केंद्राकडून दोन हजार कोटी

रस्ते, पुलांसाठी केंद्राकडून दोन हजार कोटी 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली मंजुरी

प्रतिनिधी/ पणजी

सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल शुक्रवारी नागपूर येथे केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन गोव्यातील रस्ते आणि पूल यांच्या बांधकामासाठी रु. 2 हजार कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी मिळवून घेतली. या शिवाय पणजी-बेळगाव व्हाया सांखळी-चोर्ला हा महामार्ग ‘भारतमाला’ अंतर्गत समाविष्ट करून त्याचे चौपदरीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवली आहे.

देशातील सर्व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांची बैठक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी नागपूर येथे झाली. गोव्याचे नेतृत्व अर्थात सा.बां.खा. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मंत्री ढवळीकर यांनी गोव्यातील महामार्गासंदर्भात अनेक प्रस्ताव मांडले. या सर्वच प्रस्तावांना मंत्री गडकरी यांनी मान्यता दिली.

बाणस्तारी, बोरी येथे समांतर पूल

फोंडा ते जुने गोवे या रस्त्याच्या चौपदरीकरणाबरोबरच बाणस्तारी येथे समांतर पूल उभारण्याकरीता डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. बोरी येथे समांतर पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार असून आता केवळ निविदा जारी करण्याचे काम शिल्लक आहे. या निविदा देखील डिसेंबरमध्ये जारी करण्यात याव्यात, अशी विनंती मंत्री ढवळीकर यांनी केली. मोले ते खांडेपार या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात काही खासगी वनक्षेत्रही येत असून त्यासाठी केंद्राने मान्यतेसाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती ढवळीकर यांनी केली, असता हा प्रस्ताव विचारधीन असल्याचे गडकरी यांनी त्यांना सांगितले.

खांडेपार पुलाचे उद्घाटन 10 डिसेंबरला

खांडेपार येथे 50 वर्षानंतर नव्याने पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलामुळे नेहमी या परिसरात होणाऱया वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. हा पूल बांधून तयार झाला आहे. या पुलाच्या उद्घाटन समारंभाला स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दि. 10 डिसेंबर रोजी गोव्यात येणार आहेत. त्या दिवशी सायंकाळी 5 वा. या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पुलावरील सेवांना मान्यता मिळणार

पूल बांधून तो वाहतुकीस चालू केल्यानंतर या पुलावरून वीज केबल्स, टेलिफोन केबल्स, जलवाहिनी आदी टाकण्यास परवानगी मिळावी अशी मागणी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली. सध्या अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या पुलांवर अशा सेवांना परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळे अनेक समस्या उद्भवत असल्याची माहिती मंत्री ढवळीकर यांनी या परिषदेत दिली असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे समर्थन केले. गडकरी यांनी या सेवांना परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले.

काणकोण ते नावेली महामार्गात थोडे बदल

काणकोण ते नावेली दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 या रस्त्याच्या नियोजनात थोडेफार बदल करण्यात आले आहेत. ते अंतिम झाल्यानंतर त्या बांधकामासाठी त्वरित निविदा काढण्यात याव्यात. कोलवा येथील साळ नदीतील गाळ काढून ती साफ करण्यात यावी, ही मागणीही गडकरी यांनी उचलून धरली. यामुळे मडगावातील वेस्टर्न बायपास या बगल महामार्गाचा प्रश्न व समस्या सुटणार असे, ढवळीकर म्हणाले.

पणजी-हैदराबाद महामार्ग भारतमाला अंतर्गत

पणजी-बेळगाव हा सांखळी-चोर्लामार्गे जाणाऱया महामार्गाला पणजी-हैदराबाद महामार्गाशी जोडण्यात येत आहे. हा प्रकल्प ‘भारतमाला’ अंतर्गत घेण्यात आलेला आहे. पणजी ते बेळगाव दरम्यान 110 कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाला रु. 1800 कोटी खर्च येणार आहे. वन खात्याकडून त्यास मान्यता मिळविण्यात आल्यावर त्वरित कामाला प्रारंभ होईल, असे आश्वासन गडकरी यानी मंत्री ढवळीकर यांना दिले. हाच महामार्ग पुढे हैदराबादपर्यंत जोडला जाईल. तो सोलापूर मार्गे जाईल. महामार्गाचे बांधकाम सोलापूरपर्यत होईल.