|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » दंगली घडवण्यासाठी अयोध्येचा मुद्दा पुढे : प्रकाश आंबेडकर

दंगली घडवण्यासाठी अयोध्येचा मुद्दा पुढे : प्रकाश आंबेडकर 

ऑनलाईन टीम / पुणे :

संविधान दिनानिमित्त पुण्यातील एआयएसएसएमएस ग्राउंडवर बहुजन वंचित आघाडीची भव्य सभा झाली. या सभेत बोलताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपवर टीका केली. दंगल घडवण्यासाठी हा मुद्दा उचलल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.

सध्या अयोध्येचा मुद्दा देशात चर्चेत आहे. या मुद्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, दंगल घडवून आणण्यासाठी अयोध्येचा मुद्दा समोर आणला आहे. अयोध्येच्या मुद्यावरुन दंगल होणार हे नक्की आहे. त्यामुळे दंगल होणार नाही यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. सध्याचे सरकार चवताळलेले आहे. वातावरण निर्मिती करुन मंदिर उभे राहणार नाही. मंदिरासाठी नाही तर दंगलीसाठी हा माहोल उभा केला जात आहे. यांचे राजकारण दंगलीशिवाय पूर्ण होत नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. सध्याच्या सरकारकडे दोनच मुद्दे आहेत. अयोध्येच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम दंगल आणि भारत -पाकिस्तान युद्ध, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस-राष्ट्रवादीवरही यावेळी निशाणा साधला. आघाडीच्या चर्चेसाठी उघडपणे कुणी समोर येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चर्चेसाठी कुणी पुढे आले नाही, तर आम्ही संपूर्ण सत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

एमआयएमचे आमदार इम्तयाज जलीलही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ‘अब की बार, आंबेडकर सरकार’ असा नारा इम्तयाज जलील यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी प्रोजेक्ट केले. तसेच आत्तापर्यंत जे जे विकास विकास बोलत होते त्यांनी निवडणूक येताच मंदिराचा मुद्दा धरला, अशी टीकाही त्यांनी शिवसेना-भाजपवर केली. बहुजन वंचीत आघाडीत सामिल झालेले अनेक जातींचे नेते, एमआयएमचे आमदार इम्तयाज जलील आणि माजी आमदार लक्ष्मण माने यावेळी उपस्थित होते.

Related posts: