|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » परिवर्तन घडवून आणण्याचे आव्हान

परिवर्तन घडवून आणण्याचे आव्हान 

ग्वाल्हेर

काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य सिंधिया मध्यप्रदेशात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ उमेदवार आहेत. ग्वाल्हेर राजघराण्याशी संब्ंधित असणाऱया सिंधिया यांनी युवराजाची प्रतिमा बाजूला सारून मध्यप्रदेशात परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सुमारे 1 लाख किलोमीटर अंतराचा दौरा केला आहे. या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. काँग्रेस राज्यात 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपला चुरशीची लढत देत असल्याचे अनेक सर्वेक्षणांतून सांगण्यात आले आहे.

राजकीय वारसा

47 वर्षीय ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्यप्रदेशातील  गुणा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसच्या तरुण नेत्यांमध्ये सामील ज्योतिरादित्य हे राजकीय वातावरणातच लहानाचे मोठे झाले आहेत. वडिल माधवराव सिंधिया हे काँग्रेसचे दिग्गज नेते राहिले आहेत. कुटुंबाचा राजकीय वारसा ज्योतिरादित्य यांनी चांगल्याप्रकारे सांभाळला आहे. 2002 मध्ये गुणा येथून सिंधिया हे मोठय़ा अंतराने विजयी होत संसदेत पोहोचले होते. 2014 मध्ये काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या तेव्हाही ते सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु त्यांनी विधानसभा निवडणूक कधीच लढविलेली नाही.

पहिल्यांदा 2008 मध्ये मंत्री

ज्योतिरादित्य 6 एप्रिल 2008 रोजी पहिल्यांदा मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये माहिती तसेच प्रसारण राज्यमंत्री झाले. संपुआ-2 मध्ये सिंधिया यांना ऊर्जा मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार मिळाला होता.

बलस्थाने

रोखठोक मत मांडणे : सिंधिया यांच्या भाषणांमध्ये सौम्यपणा आणि आक्रमकतेचे अनोखे मिश्रण. सभा आणि सार्वजनिक व्यासपीठांवर ते स्वतःचे म्हणणे थेटपणे मांडतात. याच कारणामुळे त्यांना ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात.

कमजोरी

सक्रीयतेचा अभाव : ज्योतिरादित्य या निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रीय स्तरावरील राजकारणातच अधिक सक्रीय राहिले आहेत. सिंधिया यांनी राजा असल्याच्या प्रतिमेवर काही प्रमाणात मात केली असली तरीही निवडणुकीत भाजप शिवराज यांना शेतकरीपुत्र ठरवून राजपरिवाराशी संबंधित सिंधियासोबत तुलना करणे विसरत नाही.

Related posts: